
सामना ऑनलाईन, मुंबई
दहशतवादविरोधी पथकाच्या मुंबई युनिटमध्ये नालासोपारा आणि पुण्यातून बेकायदेशीर कृत्य कायद्याअंतर्गत अटक केलेल्या तिघांच्या चौकशीतून आणखी शस्त्रसाठा हाती लागला आहे. नालासोपारा आणि पुण्यात आणखी हत्यारे आणि अन्य घातक साहित्य पोलिसांच्या हाती लागले आहे.
‘एटीएस’ने गेल्याच आठवडय़ात नालासोपारा येथे शरद कळसकर, वैभव राऊत आणि पुण्यातून सुधन्वा गोंधळेकर या तिघांना ताब्यात घेतले. राज्यात ठिकठिकाणी घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून या तिघांना ‘एटीएस’ने अटक केली. त्यावेळी वैभव राऊतच्या घरात आणि दुकानात मोठय़ा प्रमाणात हत्यारे सापडली होती. त्यानंतर पोलिसांनी पुण्यातूनसुद्धा हत्यारे व अन्य साहित्य जप्त केले होते. सोमवारी नालासोपारा आणि पुण्यात पुन्हा छापेमारी करीत पोलिसांनी आणखी हत्यारे आणि अन्य साहित्य हस्तगत केले. नालोसापारा येथे गावठी पिस्टल-5 अर्धवट तयार गावठी पिस्टल-3, 9 एम.एमराऊंड-11, 7.65 राऊंड-30, स्प्रिंग, ट्रिगर यासारखे शस्त्रात्रांचे अनेक सुटे भाग मिळाले. दरम्यान पुण्यात केलेल्या छापेमारीमध्ये लॅपटॉप-1, हार्डडिस्क-6, पेनड्राईव्ह-5, मोबाईल-9, अनेक सिमकार्डस्, वायफाय डोंगल-1, कार-1, दुचाकी-1 व अनेक कागदपत्रे मिळाली आहेत. वैभव, शरद आणि सुधन्वा यांच्या चौकशीतून रोज नवनवीन बाबी समोर येत आहेत.




























































