अयोध्येत बनणाऱ्या नव्या मशिदीचे नाव ‘बाबरी’ ठेवणार नाही, ट्रस्टचा निर्णय

1676

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला. न्यायालयाने अयोध्येत दुसऱ्या जागी मशिद उभारण्यास परवानगी दिली होती. यासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्यास सांगितले होते. त्यानुसार इंडो इस्लामिक फाऊंडेशन या ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्टला अयोध्येतील धन्नीपूर गावात मशिदीसाठी जागा मिळाली आहे. या जागी नवी मशिद उभारल्यानंतर तिचे नाव बाबराच्या नावावर ठेवले जाणार नाही असे ट्रस्टतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. मशिद ही ‘खुदा’ची जागा असते त्यामुळे मशिदीचे नाव राजाच्या नावावर ठेवा अथवा रंकाच्या नावावर , ते महत्वाचे नसते असं म्हटलं आहे.

अयोध्येमध्ये सर्वोच्च न्यायालयाने मशिदीच्या निर्माणासाठी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला 5 एकर जागा देण्याचे आदेश दिले होते. जी जागा मशिदीसाठी दिली आहे, त्या जागेच्या आजूबाजूला असलेल्या गावांमध्ये मुसलमान नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे. मशिदीच्या निर्माणासाठी तयार करण्यात आलेल्या ट्रस्टची इच्छा आहे की या जागेवर एक संशोधन केंद्र देखील सुरु करण्यात यावे. इथे पुस्तक संग्रहालय आणि वस्तुसंग्रहालय देखील उभे रहावे असा देखील ट्रस्टचा प्रयत्न आहे.

ट्रस्टचे अतहर हुसैन हे म्हणाले की हिंदू आणि मुसलमानांमध्ये जागेच्या वादातून जो संघर्ष निर्माण झाला होता तो पूर्णपणे बंद व्हावा अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. अयोध्येत एक चांगले वातावरण निर्माण व्हावे हा ट्रस्टचा प्रयत्न असेल. ट्रस्ट त्यांना मिळालेल्या जागेवर एक सुपर स्पेशालिटी रुग्णालय देखील उभे करण्याचा विचार करत आहे. याचा फैजाबाद आणि अयोध्या दोन्ही ठिकाणच्या नागरिकांना त्याचा फायदा होईल असं हुसैन म्हणाले. याबाबतचे वृत्त एनडीटीव्हीने प्रसिद्ध केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या