
सामना प्रतिनिधी । कणकवली
कणकवली शहरात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मागील आठवड्यात शहरात मुसळधार पाऊस पडला असल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. डासांमुळे साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता आहे.
कणकवली शहरात पटवर्धन चौक, बाजारपेठ, झेंडा चौक, शिवाजीनगर, बिजलीनगर, गांगो मंदीर परिसर आणि टेंबवाडी परिसरात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर निदर्शनास येत आहे. येथे रस्त्याच्या बाजूला ओला कचरा टाकण्यात येतो. हा कचरा पावसात भिजल्याने येथे डासांची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली आहे. त्यामुळे या परिसरात कणकवली नगरपंचायतीने डास प्रतिबंधक फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




























































