
कोरोनामुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे ठप्प झाले. तर काही कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले. लॉकडाऊनमध्ये बराचवेळ मिळाल्याने अनेकांनी आराम केला. काहीजणांनी वाचन कले. तर काहीजण पुन्हा सर्व कधी सुरू होणार याची वाट बघत होते. या लॉकडाऊनच्या जनतेने नेमके काय केले, हे जाणून घेण्यासाठी करण्यात आलेल्या सर्वेमध्ये अभियांत्रिकीच्या म्हणजे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनच्या वेळेचा सदुपयोग केल्याचे दिसून आले आहे. ब्रिजलॅब्जने यबाबतचे सर्वेक्षण केले आहे.
लॉडाऊनच्या काळात शाळा-महाविद्यालये बंद असल्याने इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी हा वेळ कौशल्य विकासासाठी वापरल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. आजच्या युगात नोकरी मिळवण्यासाठी शैक्षणिक पात्रतेसोबतच कौशल्य आणि गुणवत्ता आवश्यक असते. त्यामुळे भविष्यात चांगली नोकरी मिळवण्यासाठी आपण कौशल्यविकासावर भर दिला असून आपला बायोडेटा अधिक मजबूत केल्याचे इंजिनिअरिंगच्या 94 टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले. कौशल्य विकासासाठी अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आणि डिजिटल पर्यायांचा वापर केला. ऑनलाईनवर ज्ञान मिळवण्यासाठी आणि कौशल्य विकासासाठी कोणतीही मर्यादा नसल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कधीही कंटाळा आला नाही, असेही ते म्हणाले.
देशभरात 10 ते 14 ऑगस्टदरम्यान हा सर्वे करण्यात आला. त्यात 1100 इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना लॉकडाऊनच्या काळात काय केले असे विचारण्यात आले होते. सर्वेक्षणाची प्रक्रियाही ऑनलाईन घेण्यात आली. 42 टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सेशन अधिक उपयोगी असल्याचे सांगितले. तर 21 टक्के विद्यार्थ्यांनी वर्गातील शिक्षण गरजेचे असल्यावर भर दिला. लॉकडाऊनच्या काळात मिळवलेले ज्ञान आणि कौशल्य यांच्या आधारे आपण वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देणार असल्याचे 72 टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले. तर 28 टक्के विद्यार्थ्यांनी ऑफीसमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. सुमारे 90 टक्के विद्यार्थ्यांनी रेगुलर आणि फुलटाईम नोकरीला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.























































