
भाऊबीजेसाठी माहेरी आलेल्या माहेरवाशीणीसह तिच्या मुलाचा विहिरीत पाय घसरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी मढी येथे घडली आहे. दुपारी मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मात्र, रात्री उशिरापर्यंत आईचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. वनिता नवनाथ गाडे (वय 33), ओम नवनाथ गाडे (वय 8, दोघे रा. देवीनिमगाव, ता. शेवगाव) अशी मृतांची नावे आहेत.
वनिता भाऊबीजेसाठी मढी येथे मुलासह माहेरी आली होती. बुधवारी सकाळी सासरला देवीनिमगाव येथे जाण्यासाठी निघाली असता मुलागा ओमला घेऊन सासरला जाण्याअगोदर वडिलांच्या शेतामधील म्हसोबाच्या दर्शनासाठी दोघे गेले होते. दर्शनासाठी जात असताना पाय घसरून ओम रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडला. त्याला वाचवण्यासाठी वनिताने पाण्यात उडी मारली. मात्र, पोहोता येत नसल्याने दोघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती परिसरात कळताच ग्रामस्थ व नातेवाईक घटनास्थळी आले. गळ टाकून दोघांचा शोध घेण्यात आला. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ओमचा मृतदेह सापडला. मात्र, आईचा मृतदेह उशिरापर्यंत सपडला नव्हता.

































































