नगरमधील मोटारसायकल चोराला अटक

594

नगर शहर परिसरात मोटारसायकल चोरणाऱ्या गणेश विठ्ठल आव्हाड (वय 19, रा.गजानन कॉलनी, एमआयडीसी) याला तोफखाना पोलिसांनी शिताफीने अटक केली. ही कारवाई गुरुवारी पाईपलाईन रोडवर करण्यात आली.

तोफखाना पोलीस मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत होते. गस्तीदरम्यान पाईपलाईन रोडवरील यशोदानगर भाजी मार्केटजवळ एक तरुण नंबर नसलेल्या मोटारसायकलवरुन संशयीतरित्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला अडवून चौकशी केली असता त्याने गणेश विठ्ठल आव्हाड असे नाव सांगितले. त्याच्याकडील मोटारसायकलबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मोटारसायकल 8 तारखेला यशोदानगर भाजीमार्केट येथून चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने नगर शहरामध्ये मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडील चोरीच्या चार मोटारसायकल जप्त केल्या आहेत. ही कारवाई तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरूण मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस नाईक अविनाश वाकचौरे, वसिम खान पठाण, अहमद इनामदार, दीपक जाधव, ज्ञानेश्‍वर मोरे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन जगताप, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, संभाजी बडे यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या