
उद्या, 1 एप्रिल 2026 पासून देशातील सर्व टोलनाके कॅशलेस होणार आहेत. या नव्या नियमामुळे आता वाहनचालकांना केवळ फास्टॅग किंवा यूपीआय पेमेंटद्वारे टोल टॅक्स भरण्याची सुविधा मिळणार आहे. कोणत्याही वाहनचालकांना टोलनाक्यावर कॅश पेमेंट करता येणार नाही. फास्टॅगसाठी वाहनचालकांना फास्टॅग खाते सक्रिय करावे लागेल. अन्यथा दंड बसू शकतो.
केंद्र सरकारच्या नव्या प्रस्तावानुसार, देशातील सर्व टोल बूथवर रोखीने व्यवहार बंद केले जाणार आहेत. एनएचएआयचा मुख्य उद्देश टोल कलेक्शन सिस्टमला पूर्णपणे पारदर्शी आणि हायटेक बनवणे आहे. सध्या फास्टॅग बंधनकारक असूनही अनेक वाहनचालक रोखीने पेमेंट करतात. यामुळे टोलनाक्यावर वाहनांच्या मोठय़ा रांगा लागतात. परंतु, आता नव्या नियमानुसार, 1 एप्रिलपासून टोलनाक्यावर कॅश काउंटर पूर्णपणे बंद केले जाणार आहेत. त्यामुळे टोल देण्यासाठी वाहनचालकांना केवळ फास्टॅग किंवा यूपीआय हे दोन मार्ग उपलब्ध राहतील. एनएचएआयच्या म्हणण्यानुसार, कॅश पेमेंट बंद केल्यामुळे वाहनधारकांच्या ज्या लांबच लांब रांगा लागत होत्या त्या संपतील. इंधनाची बचत होईल. तसेच प्रदूषण कमी होऊन टोल कलेक्शन प्रक्रियेत पारदर्शकता येईल. नव्या नियमानुसार, जर वाहनचालकांकडे फास्टॅग बॅलन्स नसेल किंवा त्याचे फास्टॅग बंद पडले तर त्या वाहनधारकांना यूपीआय क्यूआर कोडद्वारे पेमेंट करावे लागेल. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील टोल 1 एप्रिल 2026 पासून 5 टक्क्यांनी महाग होणार आहे.
टोलसाठी मोजावे लागणार जादा पैसे
देशातील टोल प्लाझापासून 20 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी चार चाकी वाहनाचे मासिक शुल्क आधी 350 रुपये होते. ते आता 360 रुपये करण्यात आले. कमर्शियल वाहनांसाठी एकेरी प्रवासासाठी आधी 180 रुपये होते. आता 185 रुपये करण्यात आले. बस-ट्रकच्या एकेरी प्रवासासाठी 375 रुपयांऐवजी 385 रुपये, मोठय़ा वाहनांच्या एकेरी प्रवासासाठी 590 रुपयांऐवजी आता 605 रुपये तर ओव्हरसीज वाहनांच्या एकेरी प्रवासासाठी 720 रुपयांऐवजी 740 रुपये करण्यात आले आहेत.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोल
वाहन आधी आता
कार 270 320
टेम्पो 420 495
ट्रक 580 685
बस 797 840
3 अॅक्सेल 1380 630
मल्टी अॅक्सेल 1835 2165























































