
मुंबई तसेच आजूबाजूच्या उपनगरात पडणाऱ्या पावसाचा धसका आता रेल्वेनेही घेतला आहे. त्यामुळे मुंबई लोकल चालविणाऱया मोटरमनना प्रशिक्षण देणाऱया विरार येथील देशातील पहिल्या ‘ईएमयू-सिम्युलेटर’ प्रशिक्षण केंद्रात रेल्वे मार्गावर पावसाने पाणी साचले तर काय पावले उचलायची याचेही खास प्रशिक्षण देण्यात येऊन त्यांना खास गुण देण्यात येत आहेत.
मुंबईची लाईफलाइन लोकल ट्रेन चालविणारे मोटरमन अधिक तरबेज व्हावेत म्हणून विरार कारशेडमध्ये अत्याधुनिक मोटरमन सिम्युलेटर प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मोटरमनना प्रत्यक्ष लोकल चालविण्याचा भास देणाऱया सिम्युलेटर प्रशिक्षण केंद्रात खरोखरच्या लोकलमध्ये बसून लोकल चालविण्याचा आभास होत आहे. पश्चिम रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे चित्रण पडद्यावर प्रशिक्षणार्थींना दिसत असून रेल्वे रूळ, सिग्नल, स्थानके इतकेच काय तर स्थानकाच्या शेजारील इमारतीही स्क्रीनवर दिसण्याची सोय या आधुनिक दृकश्राव्य माध्यमावर आधारित सिम्युलेटरमध्ये आहे. देशात इतरत्र आतापर्यंत सिम्युलेटरवर केवळ लांबपल्ल्याच्या गाडय़ांच्या मोटरमनना प्रशिक्षण दिले जात होते. विरारच्या कारशेडमध्ये गेल्या वर्षी प्रथम उपनगरीय ‘ईएमयू’ लोकलच्या मोटरमनना प्रशिक्षण देणारे सिम्युलेटर केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा परिसरातही अतिवृष्टीने पाणी ट्रकवर साचल्याने गाडय़ा अडकल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. त्यानंतर येथील ट्रक उंच करून भिंतदेखील बांधण्यात आली होती. तसेच यंदा तर अतिवृष्टीने कहर केल्याने माटुंगा परिसरात पाणी साचले होते. त्यामुळे मोटरमनसाठी पावसाळी वातावरण ते काय निर्णय घेतात याचेही धडे देण्यात येत आहेत.
1000 गुणांची परीक्षा!
मोटरमनच्या (आभासी) सिम्युलेटर प्रशिक्षण केंद्रात ट्रकवरील सिग्नलचे नियम पाळले जात आहेत का? ट्रक ओलांडणारे यांना पाहून प्रशिक्षणार्थी हॉर्न वाजवितात की नाही? याबरोबरच ट्रकवर आभासी पाऊस दाखवून पावसाळी वातावरण तयार करणे, ट्रकवर पाणी दाखवून मोटरमन काय निर्णय घेतात यासाठी 1000 गुणांची परीक्षा ठेवण्यात आली आहे. त्यात 500 गुण सुरक्षा संदर्भात देण्यात आले आहेत.
अडीच तासांचे काम अर्ध्या तासात फत्ते!
पश्चिम रेल्वेकडे 108 लोकल असून त्यांची देखभाल मुंबई सेंट्रल, कांदिवली तसेच विरार येथील कारशेडमध्ये होते. अत्याधुनिक अशा विरार कारशेडमध्ये दररोज सरासरी 20 लोकलची तपासणी केली जाते. त्यापैकी पाच लोकल दिवसपाळीत तपासल्या जातात. तर दर 18 महिन्यानंतर होणारी मोठी दुरुस्ती महालक्ष्मीच्या कारखान्यात होते. विरारच्या कारशेडमध्ये लोकलचे डबे वेगळे न करता केवळ एखाद्या डब्याची चाके वेगळी काढून केवळ त्याची स्वतंत्र तपासणी करण्याचे ‘बोगी ड्रॉप टेबल’ हे देशातील पहिले केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे अडीच तासांचे काम केवळ अर्ध्या तासावर आल्याचे पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले. या कारशेडमध्ये एकाच जागी सलग तीन पिटलाइन तयार करण्यात आल्या असल्याने डब्याच्या खालच्या यंत्रणांची दुरुस्ती करणे सोपे झाले आहे.























































