गांधींनी जसे ब्रिटिशांना हाकलवले तसे भाजपला हाकलण्याची वेळ : अशोक चव्हाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड 

हे वर्ष महात्मा गांधीच्या जयंतीचे १५० वे वर्ष आहे. ज्याप्रमाणे गांधीजींनी ब्रिटीशांच्या अराजकतेला आव्हान देवून या देशातून ब्रिटीशांना हाकलले त्याचप्रमाणे या देशातून आता अराजकता, हुकूमशाही माजविणार्‍या भाजपा सरकारला हाकलण्याची वेळ आली आहे, त्यासाठी जनतेने आता सिध्द व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी येथे केले. नांदेडच्या नवामोंढा मैदानावर जनसंघर्ष यात्रेच्यानिमित्त्ताने झालेल्या विराट सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे,  हर्षवर्धन पाटील,  बाळासाहेब थोरात,  नसिम खान,  आमदार डी.पी.सावंत, आमदार अमर राजूरकर  उपस्थित होते.

अशोक चव्हाण आपल्या भाषणात म्हणाले की, “लोकांना खोटे आश्वासने देऊन भुलथापा देवून हे सरकार सत्तेवर आले. मात्र शेतकरी गोरगीरब जनता, युवक यांची निराशाच झाली. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा झाली. ३५ हजार कोटी रुपये कर्ज माफ करु अशी घोषणा केली,” झाले का कर्ज माफ असा सवाल त्यांनी केला. दोन कोटी बेरोजगारांना नोकर्‍या देण्याचे आमिष दाखविले. मात्र आता हे सरकार म्हणते आहे, लकडीकी काठी काठी पे घोडा, नौकरी मिली नही तो बेचो पकोडा, अशी अवस्था युवकांची झाली आहे.  देशात सर्वत्र अराजकताच माजली आहे. राज्यातील अनेक महिलांवर अत्याचार झाले आहेत. आजपर्यंतच्या इतिहासात एवढे अत्याचार झाले नव्हते. ऐवढे अत्याचार महाराष्ट्रात झाले. आता यांचेच आमदार राम कदम मुलगी पसंत करा, मी पळवून आणतो, अशी भाषा करत आहेत. एवढी निर्लज्ज मंडळी सत्तेत आहे. दबावतंत्राचा वापर करुन लोकशाही धोक्यात आणणारे हे सरकार आता खाली खेचण्याची वेळ आली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे हे वर्ष आहे. त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी चले जाव ची घोषणा केली आणि ब्रिटिशांना हकालले. आता देशात अराजकता, हुकूमशाही, दबावतंत्राचा वापर करुन जनतेला वेठीस धरणार्‍या या सरकारला खाली खेचण्याची वेळ आली आहे. देशातील समविचारी पक्षाला सोबत घेवून देशात आणि राज्यात २०१९ मध्ये परिवर्तन घडूनच येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, “राज्यातील परिस्थिती भयावह असताना दुष्काळाची अवस्था असताना नुसत्या घोषणांचा  पाऊस करुन देशातील व राज्यातील जनतेला उल्लू बनविण्याचे काम सध्या सुरु आहे. सरकारमध्ये कुणाचा कुणाला ताळमेळ नाही, नांदेडला स्मार्ट सिटीमधून कोणी वगळले, नांदेडच्या विकासाचा निधी कुणी थांबवला, दलितवस्तीचा निधी कुणी रोखला याचा जाब आता विचारण्याची वेळ आली आहे.”

मोठ्या खड्ड्याला देवेंद्र फडणवीस आणि त्याहून मोठ्या खड्ड्याला नरेंद्र मोदींचे नाव द्या

“संघर्ष यात्रेच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाड्यात फिरतो आहे, मात्र रस्त्यांची चाळणी झाली आहे. सगळीकडे खड्डेच खड्डे झाले आहेत. खड्डे बुजविण्याची घोषणा करणार्‍या सरकारचे पितळ उघडे पडले आहे. आता एखादा लहान खड्डा दिसला त्याला मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव द्या, त्याच्यापेक्षा मोठा खड्डा दिसला त्याला देवेंद्र फडणवीस यांचे नाव द्या आणि सर्वात मोठा खड्डा दिसला तर त्याला नरेंद्र मोदींचे नावे द्या” अशी उपासात्मक टीका खासदार अशोकराव चव्हाण यांनी यावेळी केली. नवा मोंढा भागातील या सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.