
सामना ऑनलाईन। मंदसौर
मध्य प्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यात लारनी गावातील नागरिकांना म्हशीला दगड मारणे चांगलेच महागात पडले आहे. लोकांच्या दगडफेकीमुळे चवताळलेल्या या म्हशीने गावकऱ्यांना ‘सळो की पळो’ करून सोडले आहे. ती कधीही कोणावरही हल्ला करते. यामुळे हादरलेल्या गावकऱ्यांनी घर सोडून झाडाच्या शेंड्यांवर आश्रय घेतला आहे. त्यांना खाली उतरवण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात येत आहे. यादरम्यान म्हशीच्या हल्ल्यात एका 60 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे.
काही दिवसांपूर्वी गावात अचानक एक म्हैस आली. गावात येताच तिने नागरिकांवर हल्ला करण्यास सुरूवात केली. 15 दिवसांपू्र्वी तिने एका महिलेवर हल्ला केला. यात ती महिला जखमी झाली. यामुळे या म्हशीला गावातून हुसकावण्यासाठी गावकऱ्यांनी एक शक्कल लढवली. त्यानुसार येता जाता म्हशीला प्रत्येकजण दगड मारू लागला. यामुळे म्हशीची सटकली व ती अधिकच चवताळली. आक्रमक झालेल्या म्हशीने मग गावात धुडगूस घालण्यास सुरूवात केली. घरांत घुसून तोडफोड कर, लोकांवर हल्ला कर, बकऱ्या, मेंढ्या व गायींना ढुशी मार असे उद्योग तिने सुरू केले. यामुळे हादरलेल्या लोकांनी गाव सोडून पळण्यास सुरूवात केली. तर काही जणांनी झाडांच्या शेंड्यांचा आश्रय घेतला. या गडबडीत म्हशीने लालू बंजारा नामक व्यक्तीवर हल्ला केला. त्याला शिंगांवर उचलत तिने जमिनीवर आपटले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
याबद्दल जेव्हा वनविभागाला कळाले तेव्हा त्यांनी गावात धाव घेतली. पण तोपर्यंत म्हैस तिथून निघून गेली होती. सगळे गाव रिकामे असलेले बघून अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटले. पण नंतर गावकरी झाडावर लपून बसल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने गावकऱ्यांना खाली उतरवण्यात आले. दरम्यान, प्रशासनाने म्हशीला दिसता क्षणी गोळी घालण्याचे आदेश दिले आहेत.

























































