
मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये चोरीची वेगळीच घटना उघडकीस आली आहे. लग्न करून घरी आलेली नववधू दुसऱ्याच दिवशी सासरच्या घरातील दागिने, रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू चोरून पोबारा करत होती. मध्य प्रदेशात अशाप्रकारे चोरी करणाऱ्यांची टोळी सक्रीय होती. अशा प्रकारे चोरी करून पोबारा करण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्या महिलेसह तिचा भाऊ असल्याचे सांगणाऱ्या तिच्या साथीदारालाही पोलिसांनी अटक केली आहे.
बमीठा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या चोरट्यांच्या टोळीबाबत माहिती दिली. ही टोळी लग्न होत नसलेल्या तरुणांना हेरून त्यांच्याकडून पैसे उकळत त्यांचे या महिलेशी लग्न लावून द्यायचे. लग्न झाल्यावर दुसऱ्याच दिवशी माहेरी जाते, असे सांगत ती महिला सासरच्या घरातील दागिने, रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू घेऊन फरार होत होती. तिचा शोध घेऊनही ती सापडत नव्हती. आपली फसवणूक झाली, हे समजेपर्यंत ही टोळी पसार झालेली असायची.
या टोळीने अशा प्रकारे अनेक चोऱ्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांनी अनेक तरुणांना अशा पद्धतीने फसवत लाखोंचा गंडा घातला आहे. यावेळी मात्र ही टोळी पोलिसांच्या तावडीत सापडली आहे. या महिलेचे या बमीठा पोलीस ठाण्यातील हद्दीतल्या गावात एका तरुणाशी लग्न करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या महिलेचा भाऊ असल्याचे सांगत तिला माहेरी घेऊन जातो, असा बनाव करत तिला नेण्यासाठी तिचा साथीदार आला.
सासरच्या मंडळींनी नववधूला माहेरी पाठवण्यास नकार दिला. थोड्या दिवसांनी तिला माहेरी न्या, असे त्यांनी सांगितले. आपली योजना अडचणीत येणार असे दिसताच महिलेच्या भाऊ असल्याचा बनाव करणाऱ्याने सासरच्या मंडळींशी वाद घालण्यास सुरुवात केली. अखेर हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला. आपल्या बहिणीला तिच्या सासरच्यांनी डांबून ठेवले असून ते तिला माहेरी पाठवत नाहीत, अशी तक्रार त्या तरुणाने दाखल केली.
पोलिसांना हे सर्व प्रकरण संशयास्पद वाटले. त्यांनी त्या महिलेला पोलीस ठाण्यात बोलावले. तिची चौकशी केली असता, या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला. या महिलेने आणि तिच्या टोळीने लग्नाचा बनाव करत अनेक तरुणांच्या घरात जबरी चोरी केल्याचे उघड झाले आहे. लग्न होत नसलेल्या श्रीमंत तरुणांच्या शोधात ही टोळी असायची. असे तरुण मिळताच त्यांना लग्न जुळवून देण्याचे सांगत त्यांच्याकडून पैसे उकळायचे.
ही टोळी त्या तरुणाचे या महिलेशी लग्न लावून द्यायचे. लग्न झाल्यानंतर सासरच्या घरातील दागिने, पैसे आणि मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारत माहेरी जाऊन येते, असा बहाणा करत ही महिला पोबारा करत होती. अशा प्रकारे नाव बदलून या महिलेने आणि तिच्या साथीदारांनी अनेकांना गंडा घातल्याने उघडकीस आले आहे.चौकशीत महिलेने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी महिलेला आणि तिचा भाऊ असल्याचा बनाव करणाऱ्या तिच्या साथीदाराला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. त्यांच्या एका साथादाराचा शोध घेण्यात येत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.


























































