आईशप्पथ! आंध्र प्रदेशमध्ये मासळीचा पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अमलापूरम

आंध्र प्रदेशच्या पूर्वेकडील गोदावरी जिल्ह्यातील अमलापूरम येथे पेथई चक्रीवादळाने थैमान घातले असतानाच सोमवारी येथे चक्क माशांचा पाऊस कोसळला. यावेळी आकाशातून पावसाबरोबर जिवंत मासेही जमिनीवर पडत असल्याचे बघून अमलापूरमवासियांची एकच धावपळ उडाली.

या पावसाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, ही दुर्मिळ घटना असून वेगात वारे वाहून नेणारे पेथई सारखी चक्रीवादळं अनेकवेळा किनाऱ्यावर आलेले मासे व बेडकं आपल्याबरोबर वाहून नेतात आणि जमिनीवर फेकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

माशांचा या पावसाचा व्हिडीओ अनेकजणांनी मोबाईल कॅमेऱ्यावर कैद केला व नंतर व्हॉट्सअॅपवर पोस्ट केला. त्यानंतर बघता बघता हा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर अनेकजणांनी माशांचा पावसाचा आनंद घेण्यासाठी व फुकटात मासे घेण्यासाठी अमलापूरम येथे एकच गर्दी केली. येथील स्थानिक भाषेत  या पावसाला ‘गिडासलू’ असे म्हणतात. माशांचा पाऊस पडण्याची ही जगातील पहिलीच घटना नाही. ज्या देशांमध्ये भयंकर चक्रीवादळ येतात तेथे मासे व बेडकांचा पाऊस पडणे ही सामान्य घटना आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.