दोन बहिणींना झाडाला बांधून जमावाने केली मारहाण; नऊ जणांवर गुन्हा दाखल

सामना ऑनलाईन । इंदूर

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात एका तरुणाला त्याच्या दोन चुलत बहिणींसह झाडाला बांधून अमानूष मारहाण करण्यात आली. त्या दोन मुलींमध्ये एक अल्पवयीन आहे. एका विवाहित महिलेला पळवून नेल्याचा आरोप करत त्या तरुणाला मारहाण करण्यात आली. तर त्यांना पळून जाण्यासाठी मदत केल्याच्या संशयावरून त्याच्या दोन चुलत बहीणींनाही झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. तसेच त्यांचा विनयभंगही करण्यात आला.

या तिघांना मारहाण करणाऱ्यांमध्ये त्या विवाहित महिलेच्या पतीचाही समावेश होता. या तिघांना मारहाण करण्यात आली. त्यावेळी गावकऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यांच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. अनेकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या तिघांना मारहाण होत असताना जमलेले लोक हसताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. झाडाला बांधलेल्या एका मुलीने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता एक व्यक्ती तिचा हात पकडतो आणि दोनजण तिला मारहाण करतात, असेही व्हिडिओत दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी नऊजणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पाचजणांना अटक केली आहे. त्यात तीन महिलांचाही समावेश आहे. इतर चारजण फरार आहेत. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.