
सामना ऑनलाईन । मुंबई
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. “सीमेवर आमची पोरं जातात, कोणा देशपांडे, कुलकर्णींची पोरं जात नाहीत” , असे वक्तव्य करून राजू शेट्टी यांनी ब्राह्मण समाजाची बदनामी केल्याचा आरोप करत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने याचा निषेध केला होता. तसेच राजू शेट्टी यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई करावी व स्वाभिमान शेतकरी संघटनेला निवडणूक लढवण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी देखील निवडणूक आयोगाक़डे केली होती.
राजू शेट्टी यांच्या वक्तव्यानंतर त्याविरोधात ब्राह्मण समाजातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याने शेट्टी यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. “माझं वक्तव्य शहिदांचा दर्जा मिळत नसलेल्या BSF आणि CRPF जवानांसाठी होतं. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता”, तसेच “माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला दिलगिरी व्यक्त करण्यास वाईट वाटत नाही” असे म्हणत शेट्टी यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.



























































