मालवणच्या राजकोटवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. या प्रकरणास सर्वस्वी महायुती सरकारच जबाबदार असल्याचा आरोप खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केला. या कामात हलगर्जीपणा झाला. निकृष्ट दर्जाचे सामान वापरून घाईगडबडीत पुतळा बसविण्यात आल्याचा आरोप करीत याला जबाबदार असणाऱयांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दोन दिवसांपूर्वी छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्यात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पुतळा बनविणाऱया ठाण्याच्या संबंधित शिल्पकारासह कोल्हापुरातील एक कन्सल्टंट अशा दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल सायंकाळी उशिरा छत्रपती घराण्याचे वंशज खासदार शाहू महाराज यांनी मालवण येथे भेट देऊन पुतळ्याची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी शाहू महाराजांशी बोलताना शिवरायांचा हा पुतळा अत्यंत घाईगडबडीत बसवल्यामुळेच कोसळल्याचा आरोप केला.
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना शाहू महाराज म्हणाले, पुतळा बसवताना योग्य ती काळजी घेतली गेली नाही. व्यवस्थित प्रक्रिया राबवली गेली नाही. गडबडीत पुतळा बसवला. पुतळ्यासाठी वापरलेले साहित्यसुद्धा निकृष्ट दर्जाचे असल्याने, हा पुतळा पडल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाला महायुतीतील अनेकजण जबाबदार असून, संबंधितांवर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी माणिक मंडलिक, हर्षल सुर्वे, श्रीधर गाडगीळ आदी उपस्थित होते.