
पुणे शहरातील विविध भागातील नागरिकांमध्ये दहशत माजविणाऱ्या सराईतांविरूद्ध एमपीडीएनुसार कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खडक परिसरात दहशत माजविणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला संभाजीनगर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलेली ही 70 वी एमपीडीएची कारवाई आहे.
युसुफ उर्फ आतुल फिरोज खान (वय 24, रा. लोहीयानगर) असे कारवाई केलेल्याचे नाव आहे. युसूफ हा सराईत गुन्हेगार असून त्याने साथीदारांसह खडक हद्दीमध्ये कोयता, तलवार, दांडक्यासह गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गुन्हे केले आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी पाठविला होता. त्यानुसार त्याला स्थानबद्ध करण्यात आले आहे.
आतापर्यंत 70 सराईत स्थानबद्ध
दहशत निर्माण करणाऱ्या सक्रिय गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत 70 जणांविरूद्ध एमपीडीनुसार कारवाई करून विविध कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमधील भीतीचे वातावरण कमी होण्यास मदत झाली आहे.



























































