
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) परीक्षा देऊ इच्छिणाऱया उमेदवारांना किती संधी द्यायच्या याबाबत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर नवी नियमावली बनवली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सहा वेळा परीक्षा देता येणार आहे. आश्चर्य म्हणजे, एखादा उमेदवार परीक्षेसाठी कोणत्याही कारणास्तव गैरहजर राहिला तर त्याची एक संधी वजा केली जाणार आहे. यूपीएससी परीक्षा देणाऱया उमेदवारांनाही संधीची मर्यादा असते. एमपीएससीच्या नव्या नियमाप्रमाणे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना परीक्षेच्या संधींची मर्यादा असणार नाही. इतर मागासवर्गीय उमेदवारांना किमान नऊ संधी उपलब्ध असणार आहेत. उमेदवार पूर्व परीक्षेला बसला की त्याची एक संधी झाली असे मानले जाणार आहे. तसेच गैरहजर राहिला तरी त्याने एक संधी गमावली असे होणार आहे. पुढील वर्षीपासून होणाऱया परीक्षांना ही नियमावली लागू होणार आहे.






























































