राज्यभरात एमपीएससीची परीक्षा सुरळीत, अनेक ठिकाणी परीक्षार्थींचा निरुत्साह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यभराचे लक्ष लागून राहिलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा पूर्वपरीक्षा रविवारी राज्यभरात सुरळीतपणे पार पडली असल्याचा दावा आयोगाकडून करण्यात आला आहे. मात्र मुंबईसह राज्यातील अनेक परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींचा निरुत्साह दिसून आला असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षार्थींची अनुपस्थिती मोठय़ा प्रमाणात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सर्वच परीक्षा केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या.

राज्य लोकसेवा आयोगाकडून राज्यातील 800हून अधिक परीक्षा केंद्रांवर ही घेण्यात आली. या परीक्षेला तब्बल 2 लाख 62 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी नेमकी किती जणांनी ही परीक्षा दिली याची माहिती संध्याकाळपर्यंत हाती आली नव्हती. गैरहजर राहणाऱया विद्यार्थ्यांची संख्या राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्याकडून संकलित होऊन आल्यानंतर दिली जाईल, असे आयोगाने जाहीर केले आहे. दरम्यान, मुंबईतील एकूण 51 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 ही परीक्षा 14 मार्च रोजी पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील अनेक शहरांत परीक्षा पुढे ढकलल्याने त्याविरोधात तीव्र विरोध केला होता. याची गंभीर दखल घेत राज्य सरकारने दिलेल्या सूचनेनुसार 21 मार्च रोजी ही परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे राज्यभराचे लक्ष या परीक्षेवर लागून राहिले होते.

लोकसेवा आयोगाकडून आज घेण्यात आलेल्या कोरोनाचा धोका लक्षात घेऊन परीक्षेसाठी खास अशा मानक कार्यप्रणाली आयोगाकडून जारी करण्यात आली होती.
प्रत्येक वर्गात केवळ 25 विद्यार्थी बसवण्याचे नियोजन करण्यात आले होते. तसेच सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी खास खबरदारी घेण्यात आली होती.
परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करताना मास्क, हातमोजे व सॅनिटायझरची लहान पिशवी असलेले प्रत्येकी एक किट परीक्षा केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आले होते.