हैदराबाद पोलीस चकमक व्यक्तिशः मान्य नाही- माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर

723

हैदराबाद येथे झालेल्या डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि तिच्या हत्येनंतर देशात संतापाचा आगडोंब उसळला होता. त्यानंतर या प्रकरणातील आरोपी पोलिसांकडून चकमकीत ठार झाले. त्यावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यातील बहुतांश प्रतिक्रिया या चकमकीच्या बाजूने होत्या. मात्र, हैदराबाद येथे झालेली पोलीस चकमक ही मला व्यक्तिशः पटलेली नाही, असं परखड मत मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी व्यक्त केलं आहे.

गेल्या अनेक वर्षांत सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नावारुपाला आलेल्या पार्ले कट्टा या प्रसिद्ध कार्यक्रमातील मुलाखतीवेळी त्या बोलत होत्या. म. ल. डहाणुकर महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या माधवी पेठे यांनी यावेळी भाटकर यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांनी भाटकर यांना कायदेप्रक्रियांविषयक विविध प्रश्न विचारले. देशभरात गाजलेले खटले, त्यांचे निर्णय, त्यांच्या निर्णयप्रक्रिया यांविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यात जळगाव सेक्स स्कँडल, उन्नाव प्रकरण, राम मंदिर, शबरीमाला, 26/11 हल्ल्यावेळी पोलिसांची कामगिरी असे निरनिराळे प्रश्न उपस्थितांनी भाटकर यांना विचारले. त्यावेळी हैदराबाद येथे झालेल्या पोलिस चकमकीविषयीही त्यांनी न्यायमूर्तीच्या दृष्टिकोनातून मत व्यक्त केले.

मृदुला भाटकर यावेळी म्हणाल्या की, स्त्रियांवर होणारे अत्याचार ही विकृती आहे. हैदराबाद पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत हे चारही आरोपी ठार झाले, ते मला व्यक्तिशः पटलेले नाही. कायद्याचे काही नियम असतात. पोलिसांनी न्यायनिवाडा करावा असा जर नियम असेल तर तो आम्ही नक्कीच मान्य करू, पण तसा कायदा आजतरी अस्तित्वात नाही. राज्यघटनेनुसार आपण लोकशाहीचा स्वीकार केला आहे. अनेक दिवस सारासार विचार करून राज्यघटना तयार करण्यात आली आहे. त्यानुसारच आपण वागायला हवे. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयाचे नियम किंवा कायदे यांच्या कक्षेत राहून हा निर्णय घेतला असता, तर नक्कीच हा प्रश्न सुटला असता, असे भाटकर यावेळी म्हणाल्या.

न्यायालयाची प्रक्रिया ही थोडी वेळखाऊ असते, असं म्हटलं जातं. पण, अशा प्रकरणांबाबत तितकाच विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं असतं. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागतो, असंही भाटकर यावेळी म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या