महावितरणमध्ये कमिशन घोटाळा, दक्षता विभागाकडे तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थकीत वीज बिलामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱया महावितरणमध्ये कमिशन घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. शेतकऱयांकडील थकीत वीज बिलाची वसुली बचत गटांच्या माध्यमातून केल्याचे दखवून महावितरणच्याच अधिकाऱयांनी समारे 45 कोटी रुपयांचे कमिशन लाटल्याची तक्रार महावितरणच्या आयटी विभागातील उपमहाव्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱयाने केली आहे.

राज्यातील कृषी पंपधारकांकडे सुमारे 40 हजार कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहे. त्याच्या वसुलीसाठी महावितरण स्थानिक पातळीवर बचत गटांची मदत घेत आहे. त्यानुसार बचत गटांनी वसूल केलेल्या रकमेवर त्यांना कमिशन दिले जाते. मात्र महावितरणच्या काही अधिकाऱयांनी स्वतःच बचत गट तयार करत कर्मचाऱयांनी वसूल केलेली वीज बिलाची रक्कम संबंधित बचत गटांनी वसूल केल्याचे दाखवत जवळपास 45 कोटी रुपयांचा कमिशन घोटाळा केला असल्याचा आरोप करत उपमहाव्यवस्थापक खैरनार यांनी महावितरणच्या दक्षता विभागाकडे तक्रार केली आहे.

तसेच पालघर जिल्ह्यातील बचत गटाने नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यात थकबाकी वसूल केल्याचे कागदोपत्री दाखवले आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी 51 बचत गटांनी वीज बिलाची वसुली केल्याचे दिसत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी खैरनार यांनी केली आहे.