
राज्यभर वीज वितरण करणाऱ्या महावितरणने ऑक्टोबर महिन्यात घेतलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल सहा हजार चारशे वीज कामगारांनी रक्तदान केले होते. सणासुदीमुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कमी रक्तदान होत असल्याने तुटवडा निर्माण होतो. पण वीज कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या विक्रमी रक्तदानामुळे हा तुटवडा भरून निघाला असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने स्पष्ट करत महावितरणला सन्मानपत्र दिले आहे.
रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असले तरी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये रक्तदानाच्या प्रमाणात घट होते. त्यामुळे निर्माण होणारा रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले होते. त्यानुसार महावितरणने आयोजित केलेल्या शिबिरात मोठय़ा संख्येने वीज कामगारांना रक्तदान केले होते. त्याची दखल घेत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. तसेच येणाऱ्या एप्रिल-मे महिन्यातही पुन्हा शिबीर घ्यावे, असे स्पष्ट केले आहे.























































