
सामना प्रतिनिधी, मुंबई
कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांकडील वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने ‘वन टाइम सेटलमेंट’चे धोरण अवलंबले आहे. त्यानुसार थकबाकीदार ग्राहकाने वीज बिलाची मूळ रक्कम भरण्याची तयारी दर्शवल्यास त्याला व्याजाच्या रकमेत पन्नास टक्के सूट दिली जाणार आहे. त्यामुळे महावितरणला वर्षानुवर्षे थकीत असलेल्या वीज बिलाची रक्कम मिळणार असून ग्राहकाचाही वीजपुरवठा पूर्ववत होऊ शकणार आहे.
वर्षानुवर्षे वीज बिल थकवलेल्या हजारो ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केलेला आहे. त्यांच्याकडे सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी महावितरणचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, वीज बिल थकीत असल्याने वीज कापलेल्या मालमत्तेची खरेदी केलेल्या रहिवाशाने वनटाइम सेटलमेंटचा प्रस्ताव ठेवत थकीत बिल भरण्याची तयारी दर्शवली होती. त्या पार्श्वभूमीवर वीज बिलाची थकबाकी असलेल्या मालमत्तेचे हस्तांतरण उच्च न्यायालय, डीआरटी, एनसीएलटी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून झाले असेल आणि त्यांनी संबंधित खरेदीदाराला वीजपुरवठा देण्याची विनंती केली असेल तर त्याच्याशी वन टाइम सेटलमेंट करण्याची तयारी महावितरणने दर्शवली आहे.
30 टक्के रक्कम भरल्यानंतर पुनर्जोडणी
वनटाइम सेटलमेंट झाल्यानंतर थकबाकीदाराला प्रथम 30 टक्के रक्कम भरावी लागेल. त्यानंतर त्या ग्राहकाला विजेची पुनर्जोडणी दिली जाणार आहे. तर उर्वरित रक्कम समान पाच हप्त्यांत भरावी लागणार आहे.



























































