Pune News – पुण्यात MSRTC बसची कारला धडक, भूमी अभिलेख अधिकाऱ्याचा मृत्यू; 12 जण जखमी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसने दुचाकी आणि कारला धडक दिल्याने भूमी अभिलेख विभागाच्या महिला अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात अधिकाऱ्याच्या पती आणि भावासह 12 जण जखमी झाले आहेत. जुना पुणे मुंबई महामार्गावर बोपोडी परिसरात रविवारी सकाळी ही घटना घडली. मनीषा विजयसिंह भोसले असे मयत अधिकाऱ्याचे नाव आहे. भोसले या सांगलीतील कवठेमहांकाळ येथील रहिवासी येथील रहिवासी असून भूमी अभिलेख विभागात उपअधीक्षक म्हणून कार्यरत होत्या.

MSRTC चालक अनंत पंजाबराव उईके याच्यावर बेदरकारपणे गाडी चालवणे आणि निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील खडकी आणि बोपोडी परिसरात वाहतूक विस्कळीत झाली होती.

मनिषा भोसले या पती आणि भावासह कारने चालल्या होत्या. यावेळी बोपोडी परिसरात बरधाव MSRTC बसने त्यांच्या कारसह एका दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की मनिषा यांचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील प्रवाशी आणि दुचाकीवरील दोघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. स्थानिकांच्या मदतीने अपघातातील जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले.

विजयसिंह भोसले, मनोजकुमार काटकर, कुलदिप खेमनराव राम, दिपाली सरोदे, दर्शना मोढावे, स्वप्नील भोर, शामल भोर, रमेश पवार, मारुती बगाडे, जीजाबाई बागडे, सविता कुमावत अशी जखमींची नावे आहेत.