राज्यात 215 आगारांतून वाहतूक सुरू. 26,500 कामगार डय़ुटीवर हजर; परिवहन मंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू होण्याच्या केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 26,500पर्यंत कामगार रुजू झाले असून गुरुवारी 215 आगारांतून 2382 बसेस रस्त्यावर धावल्या. सुमारे 7138 फेऱ्यांमधून सुमारे 4 लाख प्रवाशांनी प्रवास केला, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. दरम्यान, संपाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना वाहतुकीची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी एसटीने सेवानिवृत्त व पंत्राटी पद्धतीवर चालक नेमण्यास सुरुवात केल्याचेही त्यांनी सांगितले. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी आज प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते.

गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ एसटीचा संप सुरू आहे. सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर नुकतीच एसटीच्या कृती समितीच्या नेत्यांशी 10 जानेवारी रोजी सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत  परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी एक बैठक घेतली होती, त्यात एसटी कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू होण्याचे आवाहन उभयतांनी केले होते. या आवाहनामुळे रोज 300 ते 400 कर्मचारी कामावर रुजू होत आहेत. कामगारांमधील सकारात्मक बदलामुळे कामावर रुजू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यभरातील 250 आगांरापैकी 215 आगारांतून वाहतूक सुरू झाली आहे. कामावर रुजू होण्याबाबत कामगारांकडून विचारणा केली जात असून कर्तव्यावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जात असल्याचेही चन्ने यांनी या वेळी सांगितले.

कंत्राटी चालकांची नियुक्ती

संपामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी महामंडळाने सेवानिवृत्त तसेच कंत्राटी पद्धतीवर चालकांची नियुक्ती केली असल्याचे चन्ने यांनी सांगितले. विविध आगारांतून 400 पंत्राटी चालक नेमले आहेत. तसेच आतापर्यंत सेवानिवृत्त 402 चालकांचे अर्ज आले असून त्यापैकी 91 चालक पात्र ठरले  आहेत. दरम्यान, सर्व कामगारांनी कर्तव्यावर रुजू व्हावे, असे आवाहन करतानाच प्रत्येक गोष्टीला मार्ग आहे. रुजू झाल्यानंतर चर्चेतून मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही शेखर चन्ने यांनी दिली.

आतापर्यंत 1200 कोटींचा तोटा

संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना एसटीचे अध्यक्ष अॅड. अनिल परब तसेच एसटी महामंडळ प्रशासनाकडून कामावर हजर राहण्यासाठी वारंवार आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला न जुमानता संपात सहभागी झालेल्यांवर कारवाई सुरू असल्याचेही शेखर चन्ने यांनी सांगितले. आतापर्यंत दोन हजारांहून अधिक रोजंदारीवरील कामगारांची सेवासमाप्ती करण्यात आली असून 3123 कर्मचारी बडतर्फ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान संपामुळे एसटी महामंडळाला सुमारे 1200 कोटींचा तोटा झाल्याची माहितीही त्यांनी दिली.