उरण येथील एमटीएनएलची सेवा मागील पाच दिवसांपासुन ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । उरण

उरण येथील एमटीएनएलची दुरध्वनी,इंटरनेट सेवा मागील पाच दिवसांपासून कोळमडली आहे. मात्र सेवा पूर्ववत करण्यात विलंब होत असल्याने एमटीएनएलवर आधारीत असलेल्या उरण परिसरातील अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालये, कंपन्या, व्यावसायिक आणि ग्राहकांच्या कामकाजही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. मागील पाच दिवसांपासूनच एमटीएनएलची सेवा पुर्ववत होण्यास विलंब होत असल्याने ग्राहकवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

उरण येथील एमटीएनएच्या कार्यालयानजीक असलेल्या टॉवरच सोमवारी वीज कोसळली. यामुळे टॉवरचे अतोनात नुकसान झाल्याने दुरध्वनी, इंटरनेट सेवा मागील पाच दिवसांपासून कोळमडली आहे. मात्र त्यामुळे तहसिल, पोस्ट, नौदल आणि इतर शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कामकाज मागील पाच दिवसांपासुन चांगलेच थंडावले आहे. सध्या शाळा, कॉलेज प्रवेशाचा हंगाम असल्याने विविध दाखले आणि कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी उरण तहसिलदार कार्यालयात चांगलीच गर्दी उसळते. मात्र एमटीएनएलची दुरध्वनी इंटरनेटसेवा पर्ववत होण्यास विलंब होत असल्याचा जबरदस्त फटका तहसिल कार्यालया बसला आहे. मात्र एमटीएनएलकडून सेवा पुर्ववत करण्यात विलंब होत असल्याने नाईलाजास्तव खासगी केबलनेटचा वापर सुरु करुन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र त्यातही वारंवार वीज प्रवाह खंडीत होण्याच्या प्रकारात वाढ होत चालली असल्याने खासगी केबलनेटलाही मर्यादा येत असल्याची माहिती उरण तहसिलदार कल्पना गोडे यांनी दिली. तर एमटीएनलची सेवा योग्य प्रकारे मिळत नसल्याची तक्रार याआधीच सबंधित अधिकाऱयांकडे केली आहे.महिनाभरातील ३० दिवसांपैकी २० दिवसही सलग सेवा एमटीएनएलकडुन मिळत नाही. त्यामुळे कामकाजावर विपरित परिणाम होत असल्याने एमटीएनएलची सेवाच बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उरण गटविकास अधिकारी निलम गाडे यांनी यांनी दिली.

एमटीएनएलची सेवा पुर्ववत होण्यास विलंब होत असल्याने उनपची ऑनलाईनवर केली जाणारी अनेक कामे ठफ्प झाली आहेत. सेवा पुरविण्यात विलंब होत असल्याबाबत चर्चा करण्यासाठी एमटीएनएल अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले होते. मात्र एमएटीएनएलचा एकही अधिकारी चर्चा करण्यासाठी कार्यालयाकडे फिरकलाच नसल्याची माहती उनपचे प्रभारी मुख्याधिकारी संदिप खोमोणी यांनी दिली. एमटीएनएलच्या खंडीत सेवेचा फटका एमटीएनएल आधारीत अनेक बॅकांनाही बसला आहे. विशेषता स्टेट बॅकेच्या व्यवहारावर त्याचे विपरित परिणाम जाणवू लागल्याने पेन्शनधारक, ग्राहकांना बॅकेतून पैसे मिळणे अवघड होऊन बसले आहे. तसेच एटीएमचीही सेवा कोळमडली असल्याचे मेटाकुटीस आलेल्या सबंधित बॅक कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

याबाबत एमटीएनएल कार्यालयाशी संपर्क साधला असता उरण येथील टॉवरवरच सोमवारी वीज कोसळल्याने टॉवरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील पाच दिवसांपासुन कर्मचारी सेवा पुर्ववत करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहीती उरण येथील एमटीएनएल कार्यालयातून देण्यात आली. मात्र एमटीएनएलच्या ढिसाळ कामकाजावरच ग्राहकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले असुन सेवा पुर्ववत करण्यास होत असलेल्या विलंबामुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष आहे.