‘मुद्रा’ कर्ज, विदेश सहलीच्या नावाखाली 15 जणांची 80 लाखांची फसवणूक

645
bank-counter2

नाशिक शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज देण्याच्या बहाण्याने एकाची, तर विदेश सहलीच्या नावाखाली 14 जणांची एकूण 80 लाख 64 हजार 319 रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.

वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील बाळू लक्ष्मण बुतमे यांना व्यवसायासाठी मुद्रा योजनेतून कर्ज हवे होते, त्यासाठी त्यांनी 30 डिसेंबर रोजी एका ऑनलाईन क्रमांकावर संपर्क साधला. झारखंडच्या विरेंद्रकुमार नामक व्यक्तीने त्यांना ऑनलाईन नोंदणीसाठी प्रथम 3200, तर साहेबांना देण्यासाठी 16 हजार 500 रुपयांची मागणी केली. बुतमे यांनी स्टेट बँकेच्या खात्यात हे पैसे वर्ग केले. संबंधितांनी 13 जानेवारीपर्यंत व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर बुतमे यांची कागदपत्रे मागवून घेत विश्वास संपादन केला, तसेच त्यांना स्टेट बँक खात्यात वेळोवेळी एक लाख रुपये जमा करायला लावले. दरम्यान, संबंधितांनी बुतमेंना मंजुरी पत्र व डीडी पाठविला. मात्र, ते पत्र बनावट असल्याचे व ज्या खात्याचा डीडी आहे, त्या खात्यात पैसेच नसल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बुतमे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली.

पाईपलाईन रोडवरील गणेशनगर येथील संजित दिलीप बेझलवार यांना कुटुंबीयांसमवेत श्रीलंका येथे फिरण्यासाठी जायचे होते, त्यासाठी त्यांनी 7 नोव्हेंबर रोजी डिसुझा कॉलनीतील दातार ट्रॅव्हल्स अ‍ॅण्ड कन्सल्टन्सी या टूर कंपनीशी संपर्क साधला. तेथील लेखा कुलकर्णी ऊर्फ लेखा निनाद शहा यांनी 6 डिसेंबरपर्यंत बेझलवार यांच्याकडून साडेसहा लाख रुपये घेतले. मात्र, आजपर्यंत श्रीलंका टूर घडविली नाही. बेझलवार यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संबंधित कंपनीचे कार्यालय बंद आढळले. बेझलवार यांच्याप्रमाणेच अन्य तेराजणांची एकूण 79 लाख 50 हजार 100 रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बेझलवार यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अशाप्रकारे फसवणूक झालेल्यांनी गंगापूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या