रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओ एआय क्लाऊड लॉन्च करण्याचा निर्णय जाहीर केला. रिलायन्सच्या सर्वसाधारण सभेत ही घोषणा करण्यात आली. यामध्ये युजर्स आपले फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट अपलोड करू शकणार आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, जिओच्या ग्राहकांसाठी जिओ एआय क्लाऊड सेवा उपलब्ध असेल. या क्लाऊडमध्ये युजरला त्याचे फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट्ससह इतर डिजिटल कंटेंट सुरक्षित ठेवता येईल. मुकेश अंबानी म्हणाले की, कोणत्याही उत्पन्न गटाचा व्यक्ती असला तरी त्याच्याकडे एआय असेल. त्याच्यापर्यंत एआय आणि त्याची वैशिष्ट्ये असणार आहेत. त्यामुळे प्रत्येक जण त्याच्या कंपनीच्या कनेक्टेड इंटेलिजन्सचा वापर करू शकेल. त्यामध्ये एआय आणि क्लाऊड स्टोरेज इत्यादींचा समावेश आहे.
एकावर एक शेअर फ्री
रिलायन्स इंडस्ट्री आपल्या 35 लाख शेअरधारकांना मोठी भेट देणार आहे. प्रत्येक शेअरधारकाला एकावर एक शेअर फ्री म्हणजेच बोनस स्वरूपात मिळणार आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी संचालक बोर्डाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे. उदाहरणार्थ कुणाकडे रिलायन्स इंडस्ट्रीचे 100 शेअर्स असतील तर त्याचे 200 शेअर्स होतील. अंबानी यांच्या घोषणेनंतर शेअर्सच्या किमतीत वाढ झाली आहे.
ग्राहकांसाठी वेलकम ऑफर
जिओ एआय क्लाऊडच्या वेलकम ऑफरसाठी ग्राहकांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल. ही ऑफर दिवाळीनंतर सुरू होणार आहे. कंपनी युजरला 100 जीबी क्लाऊड स्टोरेज मोफत देईल. मात्र किमती नंतर जाहीर केल्या जाऊ शकतात, असे मानले जात आहे. तसेच मुकेश अंबानी यांनी एआय डॉक्टर आणि एआय टीचर ही सेवा सुरू करणार असल्याचे सांगितले. या सेवेचा अनेक लोकांना फायदा होणार आहे. ज्या भागात डॉक्टर, शिक्षक सहज पोहोचू शकत नाहीत, त्या ठिकाणी या सेवेचा फायदा होणार आहे.