
सामना ऑनलाईन, श्रीनगर
मी मृत्यूला घाबरत नाही. हिंमत असेल तर गोळ्या घाला. पण हिंदुस्थानी लष्कराविषयी कुठलीही माहिती देणार नाही, असे बाणेदार उत्तर देत जिगरबाज जवान मुख्तार अहमद मलिक हे दहशतवाद्यांशी भिडले आणि शहीद झाले. कश्मीर खोऱ्यातील कुलगाम जिल्हय़ात जवान मलिक यांनी देशासाठी शहीद होणे पसंत केले. जून महिन्यात जवान औरंगजेब हे दहशतवाद्यांच्या धमक्यांना भीक न घालता शहीद झाले होते.
43 वर्षीय शहीद जवान मुख्तार मलिक हे प्रादेशिक सेनेत लान्सनायक पदावर कार्यरत होते. 15 सप्टेंबरला अपघातात त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यासाठी ते कुपवाडा जिल्हय़ातील चुरत गावात आपल्या घरी आले होते.
शोकाकुल परिवारावर आणखी घाला

मुलाच्या मृत्यूमुळे मलिक परिवार शोकाकुल आहे. त्यांच्यावर आणखी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दहशतवादी घरात घुसले आणि जवान मुख्तार मलिक यांचा शोध सुरू केला. जवान मलिक हे घरातील पहिल्या मजल्यावर होते. दहशतवाद्यांनी त्यांना घेरले. बंदुकीचा धाक दाखवत हिंदुस्थानी लष्कर दक्षिण कश्मीरात कुठे तैनात आहे, असे विचारू लागले. मात्र जवान मलिक यांनी ‘‘मी मृत्यूला घाबरत नाही. हिंमत असेल तर गोळ्या घाला. पण लष्कराची माहिती देणार नाही,’’ असे बाणेदार उत्तर दिले. दहशतवाद्यांशी ते भिडले. दहशतवाद्यांनी अगदी जवळून जवान मलिक यांना गोळ्या घातल्या. जागीच त्यांचा मृत्यू झाला. शहीद जवान मलिक यांच्या मित्रांनी सांगितले की, आम्ही पत्रकार आहोत म्हणून दहशतवादी घरात घुसले होते.
शहीद जवान औरंगजेब घटनेची पुनरावृत्ती
जम्मू-कश्मीर प्रादेशिक सेनेत सहभागी झालेल्या कश्मीर खोऱ्यातील जवानांना दहशतवाद्यांनी यापूर्वीही टार्गेट केले आहे. 18 महिन्यांत दहशतवाद्यांनी घरी सुट्टी घेऊन आलेल्या चार जवानांची हत्या केली आहे. 16 जून रोजी जाँबाज जवान औरंगजेब यांचे पुलवामा येथून अपहरण करून दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली होती.



























































