। जगी होईजे धन्य या रामनामे।

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एखाद्या व्यक्तीचा वस्तू, परिस्थिती, घटना, कल्पना, इत्यादी घटकांना विशिष्ट प्रकारे प्रतिसाद देण्याचा जो कल किंवा दृष्टिकोण असतो त्याला वृत्ती म्हणतात. ‘एखादा मनुष्य कसा आहे? कसा वागतोय? त्यावरून त्याची वृत्ती कळून येते. किंवा एखाद्याच्या विचार करण्याच्या आणि वागण्याच्या पद्धतीवरून त्याच्या वृत्ती कळून येतात. सकारात्मक वृत्ती, नकारात्मक वृत्ती, आनंदी वृत्ती, शांत वृत्ती, समाधानी वृत्ती, विजिगीषु वृत्ती, पडखाऊ वृत्ती अशा असंख्य वृत्तिची माणसं आपल्या सभोवताली असतात. स्वभाव आणि वृत्ती यात मात्र फरक असतो. स्वभाव हा जन्मदात्यांकडून म्हणजे रक्तातलाच असतो. तो बदलता येत नाही. वृत्ती ही संस्कारातून, आजूबाजूच्या वातावरणामुळे विकसित होते,बदलत जाते. वृत्ती बदलू शकते पण त्याला योग्य सान्निध्य मिळावे लागते. म्हणूनच संस्कार झालेल्या वृत्ती रूपाला, मनाला वासनेच्या आहारी जाऊन देऊ नये, असे समर्थ बजावतात. श्रीरामाचे चिंतन करा म्हणजे कल्पनेचा लेशही उरणार नाही. अशा निष्काम भक्तीने चित्तही शुद्ध होईल. असा उपदेश समर्थ आपल्याला करतात.‘वासनेच्या संगे नको जाऊ मना। पहा त्या रावणा काय झाले। इंद्रा पडले भगे। चंद्र झाला काळा। नारद चुकला चाळा, भजनाचा। चांगदेव म्हणे जन्मा आजी आलो। गुरुपुत्र झालो मुक्ताईचा।’

– संध्या शहापुरे