स्वार्थी आणि कुटुंब उद्ध्वस्त करणारी स्त्री…अखिलेश यादव यांचा भाऊ घेणार घटस्फोट, इन्स्टा पोस्ट करत पत्नीवर लावले गंभीर आरोप

समाजवादी पार्टीचे माजी अध्यक्ष मुलायम सिंह यांचा लहान मुलगा व अखिलेश यादव यांचा लहान भाऊ प्रतीक यादव याचा घटस्फोट होणार आहे. प्रतीक यादव यांनी इंस्टाग्रामवर पत्नी अपर्णा यादव हिचा फोटो शेअर करत तिला कुटुंब उद्ध्वस्त करणारी म्हटले आहे.

प्रतीक आणि अपर्णाचे 2011 मध्ये लग्न झाले आहे. त्यांना एक मुलगी देखील आहे. अपर्णा ही आधी समाजवादी पार्टीत होती. तिने 2017 मध्ये सपामधून निवडणूकही लढवली होती. मात्र तिला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर 2022 मध्ये अपर्णाने सपाला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला.

दरम्यान प्रतीकने इंस्टाग्रामवर अपर्णाचा फोटो शेअर करत घटस्फोटाची माहिती दिली आहे. ”मी या स्वार्थी महिलेला लवकरात लवकर घटस्फोट देणार आहे. तिने माझे माझ्या कुटुंबाशी असलेले संबंध बिघडवले. तिला फक्त प्रसिद्ध व्हायचे आहे. सध्या मी अतिशय वाईट मानसिक स्थितीत आहे. तिला त्याचा काही फरक पडत नाही. ती फक्त स्वत:चा विचार करते. मी अशी वाईट व्यक्ती कधी पाहिलेली नाही. मी खूप दुर्दैवी आहे जे हिच्यासोबत माझे लग्न झाले आहे”, असे प्रतीकने पोस्ट केले आहे.