बँकॉकच्या धर्तीवर मुंबईत मल्टीलेव्हल ऍक्वेरियम, मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देश-विदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने मुंबईत बँकॉकच्या सी लाइफ ओशियन वर्ल्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे भव्य असे मल्टीलेव्हल ऍक्वेरिअम (मत्सालय) उभे करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाला दिले. ऍक्वेरिअमसाठी जागा निश्चित करण्याबरोबरच त्यासाठीचा आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही या वेळी त्यांनी दिल्या.

यासंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. त्या वेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराकडे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपल्याला नवनवीन पर्यटनस्थळे विकसित करावी लागतील. मुंबईतील क्रुझ टर्मिनलवर देश-विदेशातील क्रुझ मोठय़ा प्रमाणात येत आहेत. त्यातील पर्यटकांसाठी आता वेगळा पर्यटन कार्यक्रम आपल्याला द्यावा लागेल. यादृष्टीने पहिल्या टप्प्यात शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्टिलेव्हल ऍक्वेरिअम (मत्स्यालय) विकसित करावे, असे त्यांनी सांगितले.

मुंबईत पर्यटनाला चालना

शहरातील पर्यटनाला व्यापक चालना देण्यासाठी शहरात सी वर्ल्ड, टुरिझम स्ट्रीट, फ्लेमिंगो टुरिझम, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नाईट सफारी आदी सुरू करता येईल का याबाबतही या वेळी चर्चा झाली. शहराला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. त्याचा पर्यटनवृद्धीसाठी कसा वापर करता येईल यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या. शहरातील कान्हेरी गुंफा, जोगेश्वरी गुंफा, एलिफंटा लेणी आदींच्या क्षेत्राचा विकास करण्यात यावा. तसेच राज्यात एखादे योग्य ठिकाण शोधून तिथे आताच्या युगातील लेणी विकसित करता येतील. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी या वेळी दिल्या. मादाम तुसाद संग्रहालयाच्या धर्तीवर शहरात एखादे संग्रहालय सुरू करण्यात यावे; पण त्यात वेगवेगळे पुतळे ठेवण्यापेक्षा एखादी संकल्पना निश्चित करून ‘थीम बेस्ड’ संग्रहालय उभारण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.

सिंधुदुर्गातील पर्यटन 

या वेळी सिंधुदुर्गमधील सबमरीन पर्यटन प्रकल्पाचाही त्यांनी आढावा घेतला. सिंधुदुर्ग विमानतळ आणि या प्रकल्पाला दर्जेदार रस्त्यांची जोड देण्यात यावी. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जा राखून या प्रकल्पाचा विकास करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या. जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या बुलडाणा जिह्यातील लोणार सरोवरातील नाल्याचे पाणी बंद करून त्याची स्वच्छता राखण्यात यावी. या सरोवराच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच नाशिक जिह्यातील त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तातील पाणी शुद्धीकरणासाठीही उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

या वेळी आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय महेता, प्रधान सचिव भूषण गगराणी, पर्यटन विभागाच्या सचिव विनिता सिंगल, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, पर्यटन संचालक दिलीप गावडे, राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

रायगडचा सर्वांगीण विकास

रायगड किल्ला जतन व संवर्धन तसेच परिसर विकास करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पाचा या वेळी मुख्यमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला. रायगड विकास प्राधिकरणामार्फत तयार करण्यात आलेल्या 606 कोटी रुपये रकमेच्या रायगड विकास आराखडय़ास मान्यता देण्यात आली आहे. यातून रायगड आणि परिसरात काय काय केले जाणार आहे याचे सादरीकरण करण्यात यावे. या निधीतून रायगड किल्ला आणि परिसराचा सर्वांगीण विकास केला जाईल. यातून देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करून त्यांना शिवरायांचा इतिहास दाखवण्याबरोबरच स्थानिकांना मोठय़ा प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.