
रोजच्या आहारामध्ये जिरे नियमित वापरले जाते. आपल्या मसाल्यांच्या डब्यांमध्ये जिऱयाला महत्त्वाचे स्थान आहे. जिऱयाचे आरोग्याला होणारे फायदे आज जाणून घेऊ या.पचनाचा त्रास असो किंवा झोप न लागण्याची तक्रार असेल, या समस्यांमध्ये जिऱयाचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. जिऱयामध्ये असे इसेन्शिअल ऑइल आहे, ज्याच्यामुळे आपले पाचक रस स्रवायला मदत होते आणि त्यामुळे आपली पचनशक्तीही चांगली होते.
जिऱयामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाणदेखील जास्त आहे आणि त्यामुळे आपल्या मोठय़ा आतडय़ांची कार्यक्षमता चांगली राहते आणि पाचक संप्रेरके जास्त चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्यामुळे गॅसेस, आम्लता (ऑसिडिटी) यांचे प्रमाण कमी होऊन पोट साफ व्हायलादेखील त्याचा उपयोग होतो.
जिऱयामध्ये असेदेखील काही तत्त्व आहे, त्यामुळे कर्करोगाच्या गाठी किंवा टय़ुमर होऊ देत नाही. त्यात पोटॅशियमचे प्रमाणदेखील भरपूर असते. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित करायला याचा फायदा होऊ शकतो.
जिरे हे अँटिबॅक्टेरियल, अँटिफंगल, दाह कमी करणारे असते. या गुणांमुळे जिऱयाचा उपयोग सर्दी, दमा यांसारख्या आजारांवर होतो. तसेच स्नायूंचे दुखणे कमी करणे आणि आपली रोगप्रतिकार शक्ती वाढणे यासाठी त्याचा खूप फायदा होतो. त्यात भरपूर लोह असल्यामुळे रक्तवाढीसाठी याचा उपयोग होतो. तसेच त्याच्यामध्ये लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्यामुळे स्तनदा मातांसाठी देखील याचा खूप फायदा होतो.
यात महत्त्वाचे पोषक घटक, जसे व्हिटॅमिन बी 6, रायबोफ्लेविनदेखील असतात. तसेच व्हिटॅमिन ईदेखील असते. त्यामुळे ते आहारात हवे.
या सगळ्याचा उपयोग आपल्याला आपली स्मृती चांगली राहण्यासाठी तसेच आपली त्वचा चांगली राहण्यासाठी आणि अँटिएजिंग म्हणूनदेखील होतो.
जिऱयामुळे इन्सुलिनची कार्यक्षमतादेखील वाढते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठीदेखील हे चांगले आहे. जेवण झाल्यानंतर एक चमचा जिरे आणि एक चमचा जवस भाजून खाल्ले आणि त्याच्यावर कोमट पाणी प्यायले तर मधुमेही आणि वजन कमी करणारे यांना त्याचा चांगला उपयोग होतो.
अशा प्रकारे हे बहुगुणी जिरे, जे आपण नित्य वापरतो, त्याच्यात असे अनेक गुण असतात. त्याचा आपल्या आहारात व्यवस्थित समावेश असावा.
– अर्चना रायरीकर, आहारतज्ञ



























































