मुलुंडमध्ये झाडांवर विषप्रयोग; पालिकेकडून बिल्डरवर गुन्हा

मुलुंड पूर्व येथील डिव्हाईन एक्स्प्रेस को-ऑप सोसायटीत 11 झाडांवर विषप्रयोग करून झाडे मारण्यात आल्याच्या शक्यतेनुसार पालिकेने संबंधित विकासकावर गुन्हा नोंदवला आहे. पालिकेच्या मुलुंड टी विभागाने मे. स्वस्तिक डेव्हलपर्सविरोधात नवघर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र (शहरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संरक्षण अधिनियम, 1975 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मुलुंड येथील सामाजिक कार्यकर्ते ऍड. सागर देवरे यांनी पालिकेच्या उद्यान विभागाकडे तक्रार केली होती. याची दखल घेत पालिका अधिकाऱयांनी घटनास्थळी पाहणी केली असता 3 अशोक, 2 काळा उंबर, 3 नारळ, 1 आंबा आणि 1 काटेसावर अशी एकूण 11 झाडे मृतावस्थेत आढळून आली होती. त्यामुळे पालिकेने यासाठी शिंदेवाडी दादर 42 व्या न्यायालयात बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितली होती.