
पिसे पंपिंग स्टेशन दुरुस्तीच्या कामासाठी पालिकेने 3 ते 9 डिसेंबरपर्यंत 10 टक्के पाणीकपात करण्याचा घेतलेला निर्णय पुढे ढकलला आहे. आता ही पाणीकपात 7 ते 13 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे समजते.
मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3958 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो, मात्र यातील तब्बल 27 टक्के पाणी गळती आणि चोरीमुळे वाया जाते. त्यामुळे पालिकेने पाण्याची गळती रोखणे, जलवाहिन्यांची दुरुस्ती आणि यंत्रणेमध्ये सुधारणा करण्याचे काम सुरू केले आहे. यानुसार पालिकेच्या माध्यमातून पिसे उदंचन केंद्रामधील न्युमॅटिक गेट सिस्टीमची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामामुळे मुंबईच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार असल्यामुळे 3 ते 9 डिसेंबर या कालावधीत 10 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे या कालावधीत मोठय़ा प्रमाणात मुंबईत लाखो अनुयायी येणार असल्याने त्यांची गैरसोय होण्याची शक्यता होण्याच्या पार्श्वभूमीवर या कालावधीतील पाणीकपात मागे घेण्याची मागणी करण्यात येत होती.
याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनेही सोमवारी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना निवेदन देऊन पाणीकपात मागे घेण्याची मागणी केली होती. दरम्यान, 7 ते 13 डिसेंबर या कालावधीत 10 टक्के पाणीकपात केली जाणार असल्यामुळे मुंबईकरांनी या कालावधीत आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.



























































