
ओएलएक्सवर वस्तू खरेदीच्या नावाखाली भामट्याने तरुणाला एक रुपया ऑनलाइन पाठवून त्याच्या बँक खात्यातून 1 लाख 20 हजार रुपये काढले. फसवणूकप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ओएलएक्सवर वस्तू खरेदीच्या नावाखाली आयआयटीच्या शास्त्रज्ञाची फसवणूक केल्याची घटना ताजी असतानाच अशाच प्रकारे बोरिवलीतील तरुणाची फसवणूक झाली आहे. सप्टेंबर महिन्यात तक्रारदाराने टीव्ही आणि बेडची जाहिरात ओएलएक्सवर टाकली होती. ती जाहिरात पाहून भामट्याने तक्रारदाराला फोन केला. वस्तू आवडल्या असून पैसे ऑनलाइन पाठवण्याबाबत विचारणा केली. ऑनलाइन पैसे पाठवण्याच्या भूलथापा मारून त्याच्या बँक खात्यातून 1 लाख 20 हजार रुपये काढले गेले. फसवणूकप्रकरणी तक्रारदारांनी बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली.
आठ वेळा पाठवला क्यूआर कोड
ऑनलाइन व्यवहार करणार असल्याचे भासवून भामट्याने तक्रारदाराना क्यूआर कोड पाठवला. विश्वास बसावा म्हणून भामट्याने एक रुपया खात्यात पाठवला. त्यानंतर सहा रुपये पाठवतो असे सांगून पुन्हा नवीन क्यूआर कोड स्कॅन करण्यास भाग पाडले. तक्रारदारांनी आठ वेळा कोड स्कॅन केला, पण पैसे त्याच्या खात्यात जमा झाले नव्हते. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तक्रारदारांनी बँकेचे आलेले मेसेज पाहिले. भामट्याने तक्रारदाराच्या खात्यातून 1 लाख 20 हजार रुपये काढले.
साकीनाक्यात इंजिनीयरला लावला चुना
ओएलएक्सवर सेकंड हॅण्ड गाडी खरेदीच्या नावाखाली भामट्याने इंजिनीयरला चुना लावला आहे. सेकंड हॅण्ड गाडीची जाहिरात पाहून त्यांनी एकाला फोन केला. तेव्हा त्याने आपण सीआयएसएफमध्ये जवान असल्याचे सांगितले. अॅडव्हान्स बुिंकग आणि कुरीअर डिलिव्हरीच्या नावाखाली थातूरमातूर कारण देऊन 96 हजार 450 रुपये उकळले. साकीनाका पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.




























































