
मुंबईत कोरोना रुग्णसंख्या चांगलीच नियंत्रणात आली असून गेल्या 24 तासांत करण्यात आलेल्या 20 हजार 889 चाचण्यांमध्ये केवळ 135 बाधित रुग्ण आढळले आहेत, तर कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात 20 हजारांचा टप्पा ओलांडलेली दैनंदिन रुग्णसंख्या आता थेट शंभरीच्या घरात आली आहे. शिवाय बाधित आढळणाऱ्या रुग्णांमध्ये 95 टक्क्यांहून जास्त जणांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने मोठा दिलासा मिळत आहे. मंगळवारी आढळलेल्या 135 रुग्णांमधील 20 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील 20 जणांना ऑक्सिजनची गरज लागली. तर एकाच दिवसात 233 जणांनी कोरोनावर मात केल्याने मुंबईत आता 1315 सक्रिय रुग्ण राहिले आहेत.
























































