पावसाळ्यात यंदाही उघड्या मॅनहोलचा धोका कायम, आतापर्यंत केवळ 5 हजार मॅनहोल्सवर संरक्षक जाळ्या

पावसाळ्यातील उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्घटना होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेकडून संरक्षक जाळय़ा बसवण्यात येत आहेत. मात्र हे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असून मुंबईतील 1 लाख मॅनहोल्सपैकी केवळ 5 हजार मॅनहोल्सवर संरक्षक जाळय़ा बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अतिवृष्टी होऊन पाणी साचल्यास उघडय़ा मॅनहोल्सचा धोका या वर्षीही कायम राहणार आहे.

पावसाळय़ाला काही दिवस शिल्लक असताना मुंबईतील उघडय़ा मॅनहोल्सचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पावसाळय़ात मुंबई महापालिका आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी उपाययोजना करत आहे. मात्र हे प्रयत्न खूप धिम्या गतीने सुरू आहेत. मुंबई शहर व दोन्ही उपनगरांत मलनिस्सारण व पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या मिळून एक लाखाहून अधिक मॅनहोल्स आहेत. मात्र त्यापैकी मलनिस्सारण वाहिनी विभागाच्या अखत्यारीत 74 हजार 682 मॅनहोल्स असून त्यापैकी 1 हजार 900 मॅनहोल्सच्या फ्लडिंग पॉइंट्सवर, तर पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 25 हजार मॅनहोल्सपैकी असलेल्या 3 हजार मॅनहोल्सवर संरक्षक जाळय़ा बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळय़ातही उघडय़ा मॅनहोल्सचा धोका कायम राहणार आहे. मुंबई रुग्णालयाचे डॉ. दीपक अमरापूरकर यांचा ऑगस्ट 2017 मध्ये लोअर परळ येथील उघडय़ा मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर मुंबईतील मॅनहोल्सचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याला सहा वर्षे झाली तरी मॅनहोल्सवर संरक्षक जाळय़ा बसवण्याचे काम धिम्या गतीने सुरू आहे.

पर्जन्यजलवाहिन्या विभाग

एकूण मॅनहोल्स – 25 हजार 600
संरक्षक जाळय़ा बसवल्या – 3 हजार

मलनिस्सारण विभाग
शहर – 27,078
पूर्व उपनगर – 15,983
पश्चिम उपनगर – 31,621
एकूण मॅनहोल्स – 74 हजार 682
संरक्षक जाळय़ा बसवल्या – 1 हजार 900