विमानतळावरील पाच हजार कंत्राटी कामगारांना प्रथमच ग्रॅच्युईटी मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत (डोमेस्टिक) विमानतळावरील 5385 कंत्राटी कामगारांना भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नामुळे ग्रॅच्युईटी मिळणार आहे. याशिवाय या कंत्राटी कामगारांना तीन वर्षांसाठी तीन हजार रुपये पगारवाढ आणि प्रत्येक कंत्राटी कामगाराला प्रतिवर्षासाठी एक लाखाची मेडिक्लेम पॉलिसी मिळवून देणारा करार भारतीय कामगार सेनेने केला आहे.

कंत्राटी कामगारांच्या या करारावर भारतीय कामगार सेनेतर्फे चिटणीस संजय कदम, संतोष कदम तर जीव्हीके प्रशासनातर्फे ललित कर, सुमित मुखर्जी यांनी आणि संबंधित कंपनी प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या केल्या. या करारासाठी सहचिटणीस सूर्यकांत पाटील, जगदीश निकम, मिलिंद तावडे, सदस्य राजा ठाणगे व इतर पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. 2013 ते 2018 या कालावधीत कामाला असलेल्या कंत्राटी कामगारांना पाच वर्षांसाठी ग्रॅच्युईटी मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 1800 कंत्राटी कामगार नंतर पुढच्या टप्प्यात ही ग्रॅच्युईटी, इतर कंत्राटी कामगारांना मिळणार आहे. शिवाय ग्रॅच्युईटीचा लाभ कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी राहील.