
पायावरून रिक्षाचे चाक गेल्याचा जाब विचारणाऱया दुचाकीस्वाराचा हेतुपुरस्सर अपघात घडवून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱया रिक्षाचालकास देवनार पोलिसांनी अटक केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने रिक्षाचालकाचे कृत्य पाहून खळबळ उडाली होती. अखेर पोलिसांनी त्याचा मुसक्या आवळल्या.
घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीत राहणारे व भारतीय मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाचे मुंबई सचिव असलेले किशोर कर्डक हे घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरून त्यांच्या दुचाकीवरून जात असताना ईस्टर्न फ्री वे ब्रिजखाली सिग्नलला उभे होते. त्यावेळी त्यांच्या पायावरून रिक्षाचे चाक गेल्याने ते रिक्षाचालकाला त्याचा जाब विचारू लागले. तेव्हा दोघांमध्ये बाचाबाची झाली. पण सिग्नल सुटल्यानंतर काही अंतर पुढे जाताच रिक्षाचालकाने जाणीवपूर्वक वेडीवाकडे वळणे घेत किशोर कर्डक यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे कर्डक हे रस्त्यावर पडले, पण सुदैवाने त्यात त्यांना दुखापत झाली नाही. हे कृत्य केल्यानंतर रिक्षाचालकाने पळ काढला.
या सर्व घटनेचा एका प्रवाशाने काढलेला व्हिडीओ व्हायरल केला. तसेच कर्डक यांनी तक्रार देताच देवनार पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवून शिवाजीनगर परिसरात राहणाऱया सलमान सज्जद (34) या रिक्षाचालकास अटक केली.






























































