बेस्टच्या ताफ्यात 300 इलेक्ट्रिक बस; समितीच्या बैठकीत मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांचा प्रवास प्रदूषणमुक्त करण्यासाठी येत्या काही महिन्यांमध्ये बेस्टच्या ताफ्यात 300 इलेक्ट्रिक बसेसची भर पडणार आहे. केंद्र सरकारच्या ‘फेम-2’ योजनेअंतर्गत या बसेस बेस्ट भाडेतत्त्वावर घेणार आहे. या बसेसच्या प्रस्तावाला बुधवारी बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. केंद्र सरकार ‘फेम-2’ योजनेअंतर्गत राज्यांना इलेक्ट्रिक बसेससाठी सबसिडी देते. बेस्टलादेखील 300 इलेक्ट्रिक बस घेण्याकरिता सबसिडी मिळणार आहे. त्यानुसार 140 एसी इलेक्ट्रिक आणि 160 मिडी एसी इलेक्ट्रिक बसेस बेस्टच्या ताफ्यात येणार आहेत. बेस्टच्या वतीने टाटा मोटर्स कंपनीला इलेक्ट्रिक बससाठी कंत्राट देण्यात आले आहे. कंत्राट दिल्यानंतर 60 दिवसांत प्रोटो टाइप बसगाडी बेस्टला सादर केली जाणार आहे तर चार महिन्यांमध्ये 25 टक्के, त्यानंतर 7 महिन्यांमध्ये 50 तर 10 महिन्यांमध्ये उरलेल्या 25 टक्के बसेस येणार आहेत. या बसेस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी 1250 कोटी रुपये बेस्टतर्फे टाटाला देण्यात येणार आहेत. या बसेस आल्यानंतर ‘फेम-1’मधील रखडलेल्या 40 बसेसचा निर्णय घेण्यात येणार आहे.