
मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवासातील वेळ वाचवण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे नगसेवक बंधू मकरंद नार्वेकर यांनी मुंबई महानगरपालिकेकडे अजब प्रस्ताव मांडला आहे. दक्षिण मुंबईत धावणाऱया वाहनांमध्ये एकच व्यक्ती प्रवास करताना आढळली तर तिच्याकडून कंजेशन टॅक्स वसूल करावा, असा तो प्रस्ताव आहे.
लंडन, न्यूयॉर्क आणि सिंगापूरमध्ये असा कंजेशन टॅक्स वसूल केला जातो. त्यामुळे तेथील वाहनांच्या संख्येवरही नियंत्रण आले आहे. अशाच प्रकारचा कर मुंबईत लावला तर अनावश्यक वाहने रस्त्यावर येणार नाहीत, असा दावा या प्रस्तावात करण्यात आला आहे.
हा मुंबईकरांना लुटण्याचा भाजपचा डाव
मुंबईतील वाहनांवर कंजेशन टॅक्स लावणे म्हणजे मुंबईकरांना लुटण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव आहे, अशी टीका शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. भाजपच्या महापौरांचा कार्यकाळ अजून सुरूही झालेला नसताना नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मांडलेल्या कंजेशन टॅक्स प्रस्तावाशी भाजप सहमत आहे का? असा सवाल त्यांनी केला.
आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केली आहे. लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधीच कष्टकरी मुंबईकरांकडून आणखी पैसे उकळण्याची मागणी कशी करू शकतो? भाजप मुंबईचा आणि मुंबईकरांचा इतका द्वेष का करते? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.
“मुंबईचं काहीही भलं न करता मुंबई आणि मुंबईकरांना फक्त लुटायचं, हीच भाजपची वृत्ती आहे. मुंबई देशाच्या तिजोरीत सर्वाधिक भर घालत असतानाही केंद्रातील भाजपच्या संपूर्ण कार्यकाळात अर्थसंकल्पात मुंबईसाठी कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही.’’ असेही आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे. उद्योग आणि रोजगार सातत्याने मुंबईबाहेर हलवले जात आहेत. गेल्या 4 वर्षांत भाजपच्या राज्य सरकारकडून मुंबई लुटण्यासाठी रस्ते घोटाळा, सुशोभीकरण घोटाळा आणि अशा अनेक घोटाळ्यांना खुलेआम वाव देण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला.






























































