घरच्या बाप्पाचे विसर्जन पालिका करणार! तिसऱ्या लाटेच्या इशाऱयामुळे पालिका अलर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या तिसऱया लाटेच्या इशाऱयामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सवही खबरदारी घेऊनच साजरा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. गणेशोत्सवात होणारी गर्दी टाळण्यासाठी आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना बंदी राहणार असून घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन पालिकाच करणार आहे. यामध्ये सोसायटय़ांच्या गेटवर वाहन नेऊन मूर्ती स्वीकारण्यात येणार आहे. विसर्जनासाठी सुमारे 170 कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त हर्षद काळे यांनी दिली.

अवघ्या विश्वाचे लाडके दैवत असलेल्या बाप्पाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने सर्वांना तयारीचे वेध लागले आहेत. मात्र कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नसल्यामुळे या वर्षी गणेशोत्सव कसा साजरा होणार, कोणती नियमावली असणार असे प्रश्न भाविकांना पडत आहेत. राज्य सरकारने याआधीची सार्वजनिक मंडळांची मूर्ती चार फूट तर घरगुती मूर्ती दोन फुटांपर्यंत ठेवून कोरोना खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार अनेक मंडळांनी पुढाकार घेऊन कार्यवाही करण्याचे जाहीर केले आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी विसर्जनसाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बनवून पालिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त मूर्तींचे विसर्जन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये छोटय़ा मूर्तींचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे अन्यथा पालिकेच्या कृत्रिम तलावांत विसर्जन करावे, विसर्जन स्थळांवर गर्दी करू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

गेल्या वर्षीचा अनुभव

गेल्या वर्षी गणेशोत्सवापूर्वीच्या काळात कोविडवाढीचा दर 0.6 टक्क्यांवर आला होता. गणपतीनंतर काही दिवसांनी रुग्णवाढीचा दर 1.30 टक्क्यांपर्यंत वाढला होता. यामध्ये कोरोनावाढीचे निश्चित कारण समोर आले नसले तरी गणेशोत्सवात वाढलेल्या भेटीगाठी, गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढल्याचा अंदाज आरोग्यतज्ञांकडून व्यक्त करण्यात आला होता.

गेल्या वर्षीची व्यवस्था

  • नैसर्गिक विसर्जन स्थळे 68
  • कृत्रिम विसर्जन स्थळे 168
  • सार्वजनिक गणेशमूर्ती 3733
  • घरगुती गणेशमूर्ती 64,214
  • गौरी मूर्ती 2114

…म्हणूनच घेतला निर्णय

  • गणेशोत्सवाचे वेध लागल्यानंतर महिनाभर आधीच सार्वजनिक मंडळांसह अनेक घरगुती गणेशोत्सवासाठी नियोजन सुरू होते. यामध्ये अचानक कठोर नियम जाहीर केल्यास नागरिकांच्या रोष निर्माण होऊ शकतो.
  • पालिकेने राज्य सरकारच्या निर्देशानुसार मुंबईसाठी आवश्यक नियमावली सुरू करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत येत्या 10 ऑगस्ट रोजी पालिका आणि सार्वजनिक गणेशोत्सव समिती प्रतिनिधींसोबत बैठकही आयोजित करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त हर्षद काळे यांनी दिली.
  • मुंबईत कोरोना आटोक्यात आल्यामुळे निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे गर्दी वाढून कोरोनाचा धोका वाढू शकतो.