
घर-घराचा भाग पडणे, शॉर्टसर्किट, गॅस सिलिंडर गळती, आग लागणे, पाणी साचणे, दरड कोसळणे आदी घटनांमध्ये व्यक्ती जखमी किंवा दगावण्याची संभाव्यता असते. प्रत्यक्ष घटना घडते त्या वेळी घाबरून न जाता आलेल्या प्रसंगाला यशस्वीपणे टक्कर देण्यासाठी मुंबई महापालिका मुंबईकरांना प्रशिक्षण देणार आहे. सोमवार, 4 जानेवारीपासून पहिल्या बॅचला सुरुवात होणार आहे.
मुंबईत आपत्कालीन परिस्थिती किंवा घटनेची माहिती मिळताच आवश्यक यंत्रणांना तत्काळ कार्यन्वित केले जाते, परंतु मदत यंत्रणा पोहोचण्यापूर्वी अनेक वेळेस जीवितहानी होण्याची संभावना असते. अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर जीवित व वित्तहानी कमी होण्याच्या दृष्टीने आपत्कालीन परिस्थितीत रहिवाशांनी काय करावे याबाबतची प्राथमिक माहिती व प्रशिक्षण यात दिले जाणार आहे. सोमवार, 4 जानेवारीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. हे
प्रशिक्षण नागरिकांना
विभाग निहाय पद्धतीने व टप्प्याटप्प्याने दिले जाणार आहे. नगरसेवक अनिल कोकीळ यांच्या प्रभाग क्रमांक 204 मधील रहिवाशांकरिता सोमवार, 4 जानेवारीला सकाळी 11 वाजता ‘प्रथम प्रतिसादात्मक प्रशिक्षण कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला असून याचा उद्घाटन समारंभ ‘शहर आपत्ती व्यवस्थापन व प्रशिक्षण केंद्र, साईबाबा पथ, परळ’ येथे आयोजित करण्यात आला आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाला खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, महापालिका अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, प्रभाग समिती अध्यक्ष रामदास कांबळे, उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) प्रभात रहांगदळे आदी उपस्थित राहणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रभागातील 25 महिला आणि 25 पुरुष अशा एकूण 50 रहिवाशांना या प्रशिक्षणात सहभागी करून घेण्यात येणार आहे.
























































