
कर्मचाऱयांसाठी पालिकेने वार्षिक 354 रुपयांत दहा लाखांचे विमा संरक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे, मात्र या उपक्रमाला कर्मचाऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी ‘समूह वैयक्तिक अपघात विमा योजने’त सहभागी व्हावे असे आवाहन पालिकेने केले आहे.
पालिकेत सुमारे एक लाखांवर कर्मचारी काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांसाठी पालिकेने 2018 पासून राज्य शासनाच्या ‘समूह वैयक्तिक अपघात विमा योजने’मध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मात्र गेल्या सुमारे दोन वर्षांत 1 लाख 2 हजार 213 पालिका कर्मचाऱयांपैकी केवळ 40 हजार 349 कर्मचाऱ्यांनी या योजनेत नावनोंदणी केली आहे, तर निम्म्यापेक्षा अधिक कर्मचाऱयांनी अजूनही या योजनेत नावनोंदणी केलेली नाही. त्यामुळे या कर्मचाऱयांना विमा योजनेत सहभागी होण्याची आणखी एक संधी पालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिली असल्याचे पालिकेचे सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांनी सांगितले.
म्हणूनच सहभागी व्हा!
- गेल्या वर्षी दुर्दैवाने दोन महापालिका कर्मचाऱयांचा अपघाती मृत्यू झाला. परंतु त्यांनी त्यांच्या पगारातून 354 रुपये कापण्यास संमती दिलेली नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांना या 10 लाख रुपयांच्या अपघात विमा योजनेचा लाभ मिळाला नाही.
- तर याचवेळी दरवर्षी मार्च महिन्यात मिळणाऱया पगारातून रुपये 354 कापण्यास संमती देणाऱया कर्मचाऱयांपैकी अपघाती मृत्यू झालेल्या दोन कर्मचाऱयांचे कुटुंबीय हे या योजनेअंतर्गत रुपये 10 लाखांच्या मदतीसाठी पात्र ठरले आहेत.
- त्याशिवाय अपघातामुळे अपंगत्व आलेला एक कर्मचारी रुपये पाच लाखांच्या मदतीसाठी पात्र ठरला आहे. त्यामुळेच सर्व कर्मचाऱयांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


























































