जिगरबाज मुंबई चक्रीवादळाचा सामना करण्यास सक्षम; आदित्य ठाकरे यांचा विश्वास

784

कोरोनाविरोधात हिमतीने लढा देणारी आणि याआधी आलेली मोठमोठी संकटे परतवून लावणारी जिगरबाज मुंबई निसर्ग वादळाचा सामना करण्यास सक्षम असल्याचा ठाम विश्वास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केला. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पालिकेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पालिका प्रशासन चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर सज्ज असल्याचे सांगितले.

कोरोनाचा सामना करणार्‍या मुंबईवर आता निसर्ग चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका क्षेत्रातील सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आदित्य ठाकरे यांनी आढावा घेऊन आवश्यक सूचना दिल्या. पालिका आयुक्त चहल, सर्व सहायक आयुक्त आणि खातेप्रमुखांशी त्यांनी संवाद साधला. यामध्ये नालेसफाईत काढलेला गाळ तातडीने दूर करावा, झाडांच्या धोकादायक फांद्या तोडाव्यात, धोकादायक इमारती, जमीन खचण्याचा धोका असणारी ठिकाणे आणि पावसाचे पाणी साचण्याच्या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देशही त्यांनी दिले. कोस्टल रोड, मेट्रोच्या सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणच्या कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेणे, ओव्हरहेड वायर्सचा धोका असणार्‍या ठिकाणी आवश्यक खबरदारी घ्यावी अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

खबरदारीसाठी अशा केल्या सूचना

– लॉकडाऊसाठी पोलिसांनी उभारलेले तंबू सुरक्षित ठिकाणी हलवावे.
– मिठी नदी, आरे वसाहतीत पाणी शिरणारी ठिकाणे शोधून सुरक्षेसाठी उपाययोजना.
– खुल्या जागांमधील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे.
– स्थलांतरीत कामगारांना बाटलीबंद पाणी, खाण्याची व्यवस्था करावी.
– कोरोना संशयित-बाधित लोकांना नेताना पीपीई किट घालूनच कार्यवाही करावी.
– समुद्रकिनारी किंवा कुठेही नागरिकांची गर्दी होणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी.

मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफच्या सुसज्ज तीन तुकड्या सध्या मुंबईत आल्या आहेत. शिवाय पालिकेची संपूर्र्ण यंत्रणा सज्ज आणि सक्षम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ, सर्व लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या पाठीशी ठाम आहेत. या संकटाला घाबरून न जाता सर्वांनी एकमेकांचे अनुभव वाटून घेऊन काम करूया. – आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री

आपली प्रतिक्रिया द्या