
नेहरू नगर पोलीस वसाहतीत सोमवारी पहाटेच्या सुमारास खळबळजनक घटना घडली. गाढ झोपेत असताना कॉन्स्टेबल सुनील भगत (32) यांना कोब्रा नागाने दंश केला. हे त्यांच्या पत्नीला समजल्यानंतर बेशुद्ध झालेल्या भगत यांना नेहरू नगर पोलिसांनी तत्काळ शीव रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. विष शरीरात भिनल्याने सुनील भगत यांचा मृत्यू झाला. भर वस्तीत घडलेल्या या घटनेमुळे वसाहतीत खळबळ उडाली असून प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे.
नेहरू नगर पोलीस ठाणे परिसरात असलेल्या पोलीस वसाहतीतील इमारत क्रमांक-110मध्ये तळमजल्यावर देवनार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या समुद्धी सुनील भगत या वास्तव्यास असून त्यांचे पती सुनील भगत हे पुणे पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहेत. सुनील हे शनिवारीच मुंबईत आले होते. रविवारी दोघे जेवण करून झोपी गेले. मध्यरात्री तीनच्या सुमारास पाय सुन्न वाटू लागल्यामुळे सुनील यांनी समुद्धी यांना सांगितले. थोडय़ा वेळाने काही कळायाच्या आत सुनील यांना उलटय़ांचा त्रास होऊ लागला. उलटय़ा केल्यानंतर सुनील बेडवर येऊन पडले. त्यांना पाणी आणण्यासाठी समुद्धी स्वयंपाक घरात गेल्या असता त्यांना तेथे एक साप दिसला. त्यामुळे त्यांनी आरडाओरड करून इतरांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. नेहरू नगर पोलिसांनी लगेच सुनील भगत यांना शीव रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वी सुनील यांना मृत घोषित केले.
उंदराच्या मागे आल्याचा संशय
पोलिसांनी त्यानंतर सर्पमित्र सुनील कदम यांना बोलावून स्वयंपाक घरातील सिलेंडरच्या मागे वेटोळे मारून बसलेल्या हिंदुस्थानी कोब्रा नागाला पकडले. हा नाग अत्यंत विषारी असून त्याच्या दंशाने मानवाच्या मज्जासंस्थेवर लगेच परिणाम होतो. दरम्यान, भगत यांचे घर तळमजल्यावर असल्याने उंदराच्या मागे नाग त्यांच्या घरात घुसला असावा, असा पोलिसांना संशय आहे. या वसाहतीच्या मागच्या बाजूला मोठा नाला असून तेथूनच नाग आला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.






























































