
मुंबईत पूर्ण आटोक्यात आलेला कोरोना गेल्या आठवडाभरापासून पुन्हा एकदा वाढत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे दररोज दहा हजारांवर चाचण्या होत असताना आठवडय़ात दैनंदिन रुग्णांची संख्या 465 वरून 867 पर्यंत गेली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्याही 2 हजार 734 वरून 4 हजार 624 वर पोहोचली आहे. आठवडय़ात कोरोनामुळे चार जणांचा मृत्यूही झाला आहे.
मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर पालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केलेल्या उपाययोजनांमुळे तीन लाटा यशस्वीरीत्या परतवून लावण्यात यश आले. मात्र एप्रिलमध्ये 30 पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णंख्या मे महिन्यात थेट अडीच हजारांवर गेल्याने पालिकेचे टेन्शन वाढले होते. ही रुग्णसंख्या पुन्हा 250 ते 300 पर्यंत खाली आली होती, मात्र ऑगस्टपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे.
ऑगस्टमध्ये 12 जणांचा मृत्यू
– 1 ऑगस्ट रोजी मुंबईत दैनंदिन संख्या केवळ 164 इतकी नोंद झाली होती. यावेळी सक्रिय रुग्णांची संख्या 1889 इतकी होती, तर दुपटीचा कालावधी 2973 दिवस, रुग्णवाढीची सरासरी 0.023 इतकी होती.
– यामध्ये 13 ऑगस्टपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या 2735 इतकी वाढली असून रुग्ण दुपटीचा कालावधी 1601 दिवसांनी घटला आहे, तर रुग्णवाढीचे प्रमाणही 0.027 इतके वाढले असून ऑगस्टमध्ये आतापर्यंत 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आठवडाभराची रुग्णसंख्या
7 ऑगस्ट – 465
8 ऑगस्ट – 407
9 ऑगस्ट – 479
10 ऑगस्ट – 852
11 ऑगस्ट – 683
12 ऑगस्ट – 871
13 ऑगस्ट – 867
























































