कोरोना हरतोय, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 300 पार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता चांगलीच नियंत्रणात आली असून रुग्ण दुपटीचा कालावधी 320 दिवसांपार गेला आहे. विशेष म्हणजे मुंबईत दररोज 30 हजारांवर चाचण्या होत असूनही रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे. गेल्या दहा दिवसांत रुग्ण दुपटीचा कालावधी सहा महिन्यांनी वाढला आहे. यामध्ये मरीन लाइन्समध्ये 539 दिवसांसह सर्वेत्तम स्थिती आहे.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे आता चांगलीच आटोक्यात आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जानेवारीअखेर दैनंदिन रुग्णसंख्या थेट 334 पर्यंत खाली आली होती. मात्र कोरोनाच्या दुसऱया लाटेत दररोजची रुग्णसंख्या थेट 11 हजारांवर पार गेल्याने पालिकेचे आव्हान वाढले होते. मात्र पालिकेने पुन्हा एकदा चाचण्यांची संख्या 20 ते 25 हजारांवरून थेट 50 हजारांवर नेऊन प्रभावी उपाययोजना केल्यामुळे आता रुग्णसंख्या चांगलीच आटोक्यात आली आहे. दररोज सुमारे 30 हजारांवर चाचण्या होत असल्या तरी बाराशे ते चौदाशे पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत.

अशी आहे मुंबईची स्थिती

  • मरीन लाइन्स 539 दिवस
  • मुलुंड 508 दिवस
  • घाटकोपर 451 दिवस
  • परळ 408 दिवस
  • चेंबूर पश्चिम 402 दिवस
  • माटुंगा 397 दिवस
  • खार 341 दिवस
  • मालाड 302 दिवस
  • बोरिवली 296 दिवस
  • अंधेरी पूर्व 294 दिवस
  • भायखळा 265 दिवस
  • गोरेगाव 263 दिवस
  • अंधेरी 260 दिवस
  • कुलाबा 254 दिवस