मोठ्या शाळा, हॉटेल, सभागृहे ताब्यात घेणार, मुंबईत चार दिवसांत 50 हजार क्वारेंटाइनची सुविधा!

2000

मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला तरी कोणतीही गैरसोय होऊ न ये यासाठी क्वारेंटाइनची क्षमता चार दिवसांत दुप्पट करण्यात येणार आहे. यामध्ये मोठ्या शाळा, पालिकेच्या शाळा, हॉटेल, सभागृहे, रेस्टॉरंट, मोकळ्या इमारती ताब्यात घेतल्या जाणार आहेत. पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली. सध्या असणारी 25 हजारांची क्वारेंटाइनची सुविधा 50 हजारांपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

मुंबईत गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत तीनशेच्यावर नोंद केली जात आहे. यातच केंद्रीय पथकाने एप्रिलअखेर मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 46 हजारांवर जाणार असल्याच्या चर्चा झडायला लागल्या. मुंबई महापालिकेने याबाबत माहिती देताना सांगितले की केंद्रीय पथकाने अशी कोणतीही माहिती दिलेली नाही. असं असलं तरी खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेच्या माध्यमातून मुंबईत क्वारेंटाइनची सुविधा वाढवण्यात येत आहे.  अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी ही माहिती दिली आहे. वाढवण्यात येणार्‍या सुविधेत गरजेनुसार आयसोलेशन बेड, क्वारेंटाइन बेड यांची विभागणी करण्यात येईल असेही काकाणी म्हणाले. सध्या लक्षणे असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयासह मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. शिवाय इतर आजारांवर आजारांवर उपचार करण्यासाठी ‘फिव्हर क्लिनिक’ सुरू करण्यात आली आहेत.

अशी होतेय कार्यवाही

  • कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून ‘कोविड केअर सेंटर – १’ सुरू करण्यात आली आहेत.
  • पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या, मात्र लक्षणे नसलेल्यांना क्वारेंटाइन करण्यात आले आहे
  • यामध्ये झोपडपट्टी भागातील संशयितांचा समावेश जास्त आहे.
  • ‘कोविड केअर सेंटर -२’मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट असलेले मात्र लक्षणे नसलेल्यांना क्वारेंटाइन करण्यात आले आहे
  • या दोन्ही सेंटरमधील दाखल केलेल्यांवर पालिकेच्या डॉक्टरांच्या टीमकडून देखरेख ठेवण्यात येत आहे
  • उपचार आवश्यक असणार्‍यांवर उपचार करण्यात येत आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या