इमारतींमधील प्रतिबंधित क्षेत्रांचा चढउतार सुरूच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना रुग्णांची वाढ कायम असतानाच चाळी-झोपडपट्टय़ांमधील कंटेन्मेंट झोनपेक्षा सील इमारतींमधील प्रतिबंधित क्षेत्रांच्या संख्येत मोठा चढउतार सुरू असल्याचे समोर आले आहे. 30 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत इमारतींमधील प्रतिबंधित क्षेत्रे 581 ने कमी झाली तर 9 ऑक्टोबर रोजी 9863 सील इमारतींची संख्या 10 ऑक्टोबर रोजी 10,121 वर पोहोचली. म्हणजेच केवळ एकाच दिवसात 258 सील इमारती वाढल्या.

कोरोना रुग्ण आढळणारी ठिकाणे पालिकेच्या माध्यमातून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करून कठोर नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये दहापेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णयही अलीकडेच घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत वाढणारी रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात नियमावलीची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून दिलेल्या आकडेवारीनुसार 10 ऑक्टोबर रोजी मुंबईत सील इमारतींची संख्या 10 हजार 121 असून चाळी-झोपडपट्टय़ांमधील कंटेन्मेंट झोनची संख्या 660 आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांना अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त ये-जा करण्यास मज्जाव करण्यात आला असून नियमांच्या कठोर अंमलबजावणीसाठी सोसायटय़ांच्या पदाधिकाऱयांना आवाहनही करण्यात आले आहे.

चाळी-झोपडपट्टय़ांमधील कंटेन्मेंट झोन घटताहेत

मुंबईत चाळी-झोपडपट्टय़ांपेक्षा इमारतींमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. एकीकडे सील इमारतींची संख्या वाढत असताना चाळी-झोपडपट्टय़ांमधील कंटेन्मेंट झोनची संख्या मात्र काही प्रमाणात घटत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये 30 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत कंटेन्मेंट झोनची संख्या 5 ने कमी झाली तर 30 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीत 20 ने तर 9 आणि 10 ऑक्टोबर या एकाच दिवसात कंटेन्मेंट झोनची संख्या 15 ने कमी झाली आहे.